स्वप्नील लोणकरची आत्महत्या व्यर्थ? उमेदवार अजूनही नियुक्त्यांच्या प्रतिक्षेत
स्वप्नील लोणकरची आत्महत्या व्यर्थ? उमेदवार अजूनही नियुक्त्यांच्या प्रतिक्षेतSaamTv

स्वप्नील लोणकरची आत्महत्या व्यर्थ? उमेदवार अजूनही नियुक्त्यांच्या प्रतिक्षेत

एकूण ८३२ उमेदवारांची शिफारस कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नियुक्तीसाठी करण्यात आली.
Published on

मार्च २०२० पासून जागतिक कोरोना महामारीचे संकट आले आणि त्यामुळे एमपीएससीला अनेक परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या, निकाल लावण्यास, मुलाखत प्रक्रिया राबविण्यास विलंब झाला. याच अनुषंगाने एमपीएस्सीद्वारे सन २०१७ साली एकूण ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांकरिता परीक्षा घेतली. या परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल दि. ९ सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर झाला. एकूण ८३२ उमेदवारांची शिफारस कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नियुक्तीसाठी करण्यात आली.

शिफारसपात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणीची सुरुवात झाल्यानंतर मार्च २०२० पासून कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय कार्यालये या काळात बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि बंद असलेली शासकीय कार्यालये यामुळे मोटार वाहन विभागाला ८३२ उमेदवारांपैकी ७८५ उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडता आली. उर्वरित ४७ जागांवरची नियुक्ती प्रक्रिया लॉकडाऊनमुळे पूर्ण करता नाही.

● एमपीएससीने मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारला

लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेल्या जागांवर नियुक्तीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मूदतवाढीचा प्रस्ताव मोटार वाहन विभागाकडून एमपीएससीला पाठविण्यात आला. मात्र एमपीएससीकडून मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे ४७ उमेदवार हे नियुक्त्यांपासून वंचित राहिले.

एमपीएससीने मुदतवाढीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकाचे कारण देऊन नाकारला. शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांना विहित कालावधीत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचे हे परिपत्रक आहे, ज्यामध्ये निकालानंतर एक वर्षांमध्ये नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतू सामान्य प्रशासन विभागाच्या या परिपत्रकामध्ये प्रशासकीय विभागांना नैसर्गिक आपत्तीमुळे एक वर्षांमध्ये नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यास मर्यादा आल्या तर काय करायचे याची नियमावली देण्यात आलेली नाही. सदरच्या भरतीत नियुक्ती प्रक्रियेच्या एक वर्ष कालावधीतील सहा महिने म्हणजे निम्मा कालावधी हा लॉकडाऊनमुळे वाया गेलेला आहे त्यामुळे ४७ नियुक्त्या विद्यार्थ्यांची यात काही चूक नसताना नियमांच्या कचाट्यात सापडल्या आहेत.

● सुधारित अध्यादेशाची प्रलंबित ४७ उमेदवारांची मागणी

नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच कोरोना महामारीमुळे नियुक्तीप्रक्रियेचा वाया गेलेला कालावधी एमपीएससीच्या परीक्षांच्या नियुक्तीच्या एक वर्ष या कालावधीमध्ये मोजू नये. जेणेकरून वर्षांनुवर्षे अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे नियुक्त्यांपासून वंचित राहणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही. याबाबत सुधारित आदेश काढून तो सन २०२० पासून लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेल्या व प्रतीक्षा यादींमधून निवड होणाऱ्या उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी लागू करावा. हा शासकीय अध्यादेश काढण्यासाठीचे निवेदन विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठवले आहे.

● उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने या ४७ विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

नियक्तीपासून प्रलंबित असणाऱ्या उमेदवारांनी खालील मुद्दे उपस्थित केले आहेत.

१. कोविड काळात एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्या, मुलाखती पुढे ढकलल्या मग मोटार वाहन विभागाने नियुक्ती प्रक्रियेसाठी केलेली मुदतवाढीची मागणी एमपीएससीने का नाकारली ?

२. एमपीएससीने प्रलंबित नियुक्त्या पूर्ण करण्यासाठी केलेली मुदतवाढीची मागणी नाकारल्यानंतर मोटार वाहन विभागाने संबंधित बाब मा. मुख्यमंत्रांच्या निदर्शनास का आणून दिली नाही ?

३. संपूर्ण देशभरात लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सरकारी कार्यालये बंद होती तरीसुद्धा एमपीएससी नियमांवर बोट ठेऊन विद्यार्थ्यांना नियुक्तीपासून दूर ठेऊन काय साध्य करू इच्छित आहे?

४. राज्यात स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर देखील प्रलंबित नियुक्त्यांच्या बाबतीत शासन एवढे उदासीन का आहे ?

५. कोरोना मुळे लॉकडाऊन होणे आणि नियुक्त्या न मिळणे यात प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांची काय चूक आहे ?

● वेळ निघून गेल्यानंतर सांत्वन भेटी काय कामाच्या ?

ज्याच्या भोवती हे सगळं प्रकरण फिरत आहे त्या विद्यार्थ्यांचा यात काय दोष ?एमपीएससीच्या नियमात अन प्रशासनाच्या दिरंगाईत मरण आहे ते फक्त वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं. सध्या सरकार आणि मीडिया या प्रकरणाची दखल घेत नाही. उद्या याच ४७ मधील कोणी आत्महत्या केली तर सांत्वन भेटी घ्यायला दारात रांग लावतील. वेळीच या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित ४७ नियुक्त्या तातडीने मार्गी लावाव्यात.

_ नियुक्तीच्या प्रतिक्षेतील ४७ उमेदवार

राजकुमार देशमुख (यशवंतनगर अकलूज)

मोबाईल: 9765961212

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com