माझा देश कोणता?

माझा देश कोणता?

सकाळी जाग आली 
काहीतरी आठवलं
तशी ताडकन सावधान स्थितीत उभी राहिले...
कपाटातली फाईल घेतली
आणि त्यात पुरावे शोधू लागले
आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता
जीवन मरणापेक्षाही मोठा प्रश्न
स्वत:चं नागरिकत्व सिद्ध करण्याचा...

श्वासही नाकातल्या नाकात घुटमळत होता
जीव कंठाशी आला होता
कंठ फुटत नव्हता
शरीरच जणू जीवविरहीत झालं होतं
एखादा इलेक्ट्रिकल शॉक बसावा तसं
पण सारं बळ एकवटून मी हात कामाला लावले होते
पुरावे शोधू लागले होते
अचानक लक्षात आलं
सकाळी उठल्यानंतरच्या घोषणा द्यायला विसरले होते
नवा नियम करण्यात आला होता
भूमातेला नमस्कार करण्यापूर्वी
'भारत माता की जय' म्हणण्याचा
एवढ्या गडबडीतही मी घोषणा दिल्या
कारवाईची आणखी कोणतीच संधी द्यायची नव्हती
तेवढ्यात किचनमधून आईने आवाज दिला
चहा तयार आहे
चहा तर प्यायलाच हवा होता
चहाला राष्ट्रीय पेय ठरवण्यात आले होते..
चहा प्यावा लागला गरम गरमच
तोंड भाजलं पण हरकत नाही
मन तर आख्खे जळाले होते
चहाचा पेला ठेवला, 
लगेच हात कामाला लावले..
आधारकार्ड हाती लागलं
पण त्यात स्पेलिंग मिस्टेक होती
जन्माचा दाखला, शाळेचा दाखला नव्हताच
पुराच्या पाण्यात भिजून संपलाचं होता
पॅनकार्ड होतं, पण ते ग्राह्य नव्हतं
तातडीने आईला विचारलं...
माझ्या जन्माचा पुरावा?
मी भारतीय असल्याचा पुरावा?
तिने तिच्या ओटीपोटाला हात लावला नकळत
पण काही पर्यायचं नव्हता
किमान तिचे तरी नागरिकत्वाचे पुरावे होते
पण लांबच्या बहिणीची व तिच्या नवऱ्याची चिंता
तिच्या नवऱ्याकडे पुरावे नव्हते,
त्यालाही देश सोडावा लागणार होता 
पटकन गावची आठवण झाली
आज्जीआजोबांचे काय?
त्यांना तर त्यांची जन्मतारीखही नीट माहिती नव्हती
कोणत्या शेतात कोणत्या वर्षी कोणते पीक घेतले?
वर्षानुवर्षाच्या पिकांची यादी तोंडपाठ होती
माती कसून तिचं सोनं केल्याच्या खुणा
त्यांच्या प्रत्येक सुरकुतीवर होत्या
आयुष्यभर मातीत राबलेल्या हाताला मातीचा रंग आला होता
पण नागरिकत्वाचा पुरावा?
तो त्यांच्याकडे नव्हता...
स्वातंत्र्यलढयाच्या चार-दोन आठवणी 
इंदिराबाईंची चार-दोन भाषणं
साखर कारखान्याची स्थापना
निवृत्तीशेठ शेरकरांची खासदारकी 
अशा केवळ चार-पाच राजकीय घटना
एवढंच राजकारण त्यांच्या आयुष्यात त्यांना माहिती
पण आता पुरावा आणायचा कुठून?
त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं
पण त्यांना माझ्याइतकी चिंता नव्हती
आयुष्यभर येणाऱ्या संकटांसारखे  हे आणखी एक
एवढेच त्यांना माहिती होते
कारण त्यांना 'नागरिकत्व' म्हणजे काय?
हेच माहिती नव्हते..

मी काय करु?
कसं करु?
मी, आज्जी, आजोबा, लांबची बहीण..
आम्हाला देश सोडावा लागणार होता...
म्हणजे नक्की काय करावं लागणार होतं?
कुठे जावं लागणार आता?
जी काही माहिती समोर येत होती
आ्ज्जी-आजोबांना बहुतेक वेगळ्या देशात 
व मला वेगळ्या देशात जावं लागणार होतं..
म्हातारपणी ते कुठं जाणार, काय करणार?
त्यांना या सरकारच्या निर्णयाची नीट माहिती पण नाही
आमच्यासाठी कुणी काहीच करु शकत नव्हतं
खिडकीबाहेर कसलातरी आवाज येऊ लागला...
पाहिलं तर काय?
लोक 'भारत माता की जय' च्या घोषणा देत होते
तसे नाही केलं तर त्यांना 'देशद्रोही' ठरवण्यात येणार होते
अरे बाप रे..
मी हातातली फाईल खाली टाकली..
मी इमारतीच्या खाली गेले...
घोषणा सुरुच आहेत
त्यांना काहीतरी सांगायचंय मला..
पण काय सांगू?
अरे बापरे भारत...
भारत-माझा दोस्त
तो तर घोषणा देत नाहीये...
त्याचं काय झालं?
त्याला पुरावे सापडले का?
अरे ऐक...
भारत... भारत...
ताडकन जाग आली...
तेव्हा जामियाचा लाठीचार्ज टीव्हीवर सुरु होता
सोबत उन्नावची बातमी दाखवत होते
आता भारतला खरचं कॉल केला 
व विचारलं
"माझा देश कोणता?"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com