BLOG - अतिरेकी माध्यमांचं करायचं तरी काय ?

BLOG - अतिरेकी माध्यमांचं करायचं तरी काय ?
Published On

सध्‍या सगळीकडे देशभक्‍तीचे वारे जोरात वाहू लागलेत. देशभक्‍तीचे वारे वाहणं, चांगलंच आहे. पण ती फक्‍त निवडणुका डोळ्यासमोर दिसतेय म्‍हणून फेसाळतेय. निवडणुकांच्‍या आधी, म्‍हणजे या साडेचार-पाच वर्षात देशभक्‍तीचा इतका फेस कधी फेसाळलेला पाहायला मिळाला नाही. त्‍यामुळं आताची दिखाऊ देशभक्‍ती फेसाळणारी आहे, असं म्‍हणण्‍याचं धाडस करावंसं वाटतंय. पंतप्रधान मोदींसह भाजप नेते- कार्यकर्त्‍यांची ही देशभक्‍ती फक्‍त जाहीर सभा-कार्यक्रमांमधूनच दिसतेय, असंही नाही. ती आता लोकशाहीच्‍या चौथ्‍या स्‍तंभातही दिसायला लागलीय. लोकशाहीचा चौथा स्‍तंभ समाजाचा आरसा म्‍हणून काम करणं अपेक्षित असतं. मग हा आरसा सरकारबरोबच विरोधकांनाही दाखवला जावा, एवढी माफक अपेक्षा असते. पण या अपेक्षेला हरताळ फासण्‍याची आणि सत्‍ताधारी पक्षाला खुश करण्‍याची स्‍पर्धा माध्‍यमांमध्‍ये लागलेली दिसतेय. 

पुलवामा प्रकरणानंतर देशभरात पाकिस्‍तानविरोधात संतापाची लाट उसळली. पाकिस्‍तानविरोधातला संताप देशातल्‍या प्रत्‍येक शहरात पाहायला मिळाला. याची दखल घेत केंद्रानंही पाकिस्‍तानविरोधात आक्रमक भूमिका घेत पाकिस्‍तानला दिलेला विशेष दर्जा (मोस्‍ट फेवर्ड नेशन) काढून घेतला. आयातीवर कठोर निर्बंध घातले. पाकिस्‍तानात वाहणा-या नद्यांचं पाणी रोखण्‍याचा निर्णय घेतला. आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपीठावर कोंडी करायला सुरुवात केली. त्‍यात यशही मिळालं. पाकिस्‍तानच्‍या आणि पाकिस्‍तानी अतिरेक्‍यांच्‍या कुरापतींना उत्‍तर देण्‍याचं स्‍वातंत्र्य लष्‍कराला दिल्‍याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं. कुठं, कसं आणि कधी उत्‍तर द्यायचं, हे लष्‍करच ठरवेल, हेही मोदींनी सांगून टाकलं. मोदींच्‍या या घोषणेनंतर भारतीय हवाई दलानंही थेट पाकव्‍याप्‍त काश्‍मीरमध्‍ये घुसत बालाकोटमधल्‍या 'जैश'च्‍या अतिरेकी तयार करण्‍याच्‍या कारखान्‍यावर हल्‍ला चढवला.


देशभक्‍तीच्‍या लाटेवर प्रसारमाध्‍यमंही स्‍वार !  

भारतीय हवाई दलाच्‍या हल्‍ल्‍यानंतर देशभरात पुलवामा प्रकरणाचा बदला घेतल्‍याची भावना पसरली. बदला आणि देशभक्‍ती या दोन्‍ही भावनांची लाटच देशभरात उसळली. तिचं प्रतिबिंब भारतीय प्रसारमाध्‍यमांच्‍या छोट्या पडद्यावरही दिसायला लागलं. ही लाट मोठी असल्‍याचं जाणवताच, तिच्‍यावर स्‍वार होण्‍याचे पुरेपूर प्रयत्‍न सत्‍ताधारी पक्षाकडून केले गेले. याला विरोधी पक्षांकडून आक्षेपही घेतला जाऊ लागला. पण सत्‍ताधारी पक्षांकडूनच नाही, तर प्रसारमाध्‍यमांकडूनही आक्षेप घेणा-यांना देशद्रोही ठरवलं जाऊ लागलं. देशद्रोही आणि देशप्रेमी असे दोनच जमाती निर्माण केल्‍या जाऊ लागल्‍या. याच मुद्यावर दररोजच्‍या चर्चा झडू लागल्‍या. 


माध्‍यमंच बनली न्‍यायालयं!

या चर्चांमध्‍ये मोदी विरोधकांना, म्‍हणजेच फक्‍त आणि फक्‍त विरोधी पक्षांना देशद्रोह्याच्‍या पिंज-यात उभं केलं जाऊ लागलं. बरं, या सर्वांची चूक एकच.... त्‍यांनी हवाई हल्‍ल्‍याचा 'हिशेब' मागायला सुरुवात केली. हिशेब मागतानाही आम्‍हाला लष्‍कराच्‍या, हवाई दलाच्‍या शौर्यावर आणि क्षमतेवर अजिबात शंका नाही, असं बेंबीच्‍या देठापासून ओरडून सांगत होते आणि आजही सांगत आहेत. पण त्‍यांची ही भूमिका सत्‍ताधारी पक्षाप्रमाणेच माध्‍यमंही ऐकून घ्‍यायला तयार नाहीत. हे सारं होत असताना, यातून बी. एस. येडियुरप्‍पा, हेमंत विश्‍वास, एस. एस. अहलुवालियांसारख्‍या सत्‍ताधारी पक्षातील नेत्‍यांची गंभीर विधानं एक तर दुर्लक्षित राहिली किंवा त्‍याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. काही झालं तरी माध्‍यमं (यात प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक दोन्‍ही समाविष्‍ट आहेत) सत्‍ताधारी पक्षाच्‍या नेत्‍याच्‍या किंवा प्रवक्‍त्‍याच्‍या भूमिकेत डॉमिनेटिंग भूमिका बजावू लागली.  


देशभक्‍त विरुद्ध देशद्रोह अशीच विभागणी ! 

सुरवातीला बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटी अशा तीन ठिकाणच्‍या अतिरेकी छावण्‍यांवर हल्‍ले झाल्‍याचं सांगितलं जात होतं. यात 400 च्‍या जवळपास अतिरेकी मारले गेले, हे माध्‍यमंच सांगत सुटली. त्‍याला सरकारच्‍या किंवा लष्‍कराच्‍या बाजूनं कोणीही दुजोरा देत नव्‍हतं. यामुळंच नेमके किती अतिरेकी मारले गेले, असा प्रश्‍न विरोधकांनी विचारायला सुरुवात केली. या प्रश्‍नाचं उत्‍तर देण्‍याऐवजी त्‍यांना देशद्रोही ठरवलं जाऊ लागलं. त्‍यांनी विचारलेले गंभीर प्रश्‍नही या नव्‍या विभागणीत विरत गेले. परदेशी माध्‍यमांनी या हल्‍ल्‍याच्‍या यशाबद्दल शंका घेऊ लागले. त्‍यांचं निरसन करण्‍यासाठी तरी नेमके किती अतिरेकी मारले गेले, हे जाहीर करणं आवश्‍यक होतं. पण तसं काही होताना दिसलं नाही. सगळ्या चर्चा पुन्‍हा-पुन्‍हा देशभक्‍त आणि देशद्रोही याच चौकटीत झडू लागल्‍या. अशातच भाजपाध्‍यक्ष अमित शहांनी एक आकडा जाहीर केला. त्‍यांनी हा आकडा कसा सांगितला, असा प्रश्‍न विरोधक विचारु लागले. त्‍याचंही उत्‍तर टाळलं गेलं. नाही म्‍हणायला काल-परवा परराष्‍ट्र राज्‍यमंत्री व्‍ही. के. सिंहांनीही तोच आकडा रिपीट केला. याबरोबरच फक्‍त बालाकोटवरच हा हल्‍ला झाल्‍याचं सांगितलं.


विरोधकांनी 'हा' निर्णय घ्‍यावाच !

निवडणुकांचा निकाल जाहीर होईपर्यंत माध्‍यमातल्‍या चर्चा अशाच पद्धतीने चालणार, हे जवळपास स्‍पष्‍ट आहे. प्रत्‍येक वेळी मूळ विषयाला बगल देत देशभक्‍त आणि देशद्रोह अशीच मोजपट्टी लावलं जाणार, हेही स्‍पष्‍ट दिसतंय. त्‍यामुळं विरोधकांनी अशा कुठल्‍याही चर्चांमध्‍ये सहभागी न होण्‍याचा निर्णय घेतला पाहिजे, असं मला वाटतं. याचं कारण या चर्चा कुठल्‍याही परिस्थितीत विकासाच्‍या, पक्षाच्‍या कार्यक्रमांच्‍या मुद्यांवर होणारच नाहीत. त्‍यामुळं दूरदर्शन वगळता कुठल्‍याही माध्‍यमांच्‍या चर्चांमध्‍ये सहभागी होऊ नये. राष्‍ट्रीय आणि राज्‍य पातळीवर चर्चा करण्‍यासाठी विरोधकांनी दूरदर्शन आणि दूरदर्शनच्‍या प्रादेशिक वाहिन्‍यांना प्राधान्‍य द्यावं, असं मला वाटतं. दूरदर्शनच्‍याच व्‍यासपीठावर आपआपल्‍या पक्षाची कामगिरी, भविष्‍यातले कार्यक्रम यावर सविस्‍तर चर्चा करावी आणि इतर माध्‍यमांच्‍या चर्चा टाळाव्‍यात.  

यामुळं एक गोष्‍ट नक्‍की होईल. ती म्‍हणजे, माध्‍यमांमधून प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक गोष्‍टीतून ओढूनताणून विरोधकांना देशद्रोही म्‍हणून रंगवण्‍याचा प्रयत्‍न होणार नाही. ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर हुतात्‍मा जवानाच्‍या पत्‍नीचे पाय धरणा-या निर्मला सीतारमण (भले, उरीच्‍या वेळी त्‍यांना हे सुचलं नसेल, पण आता निवडणुकीच्‍या तोंडावर सुचलं असलं तरी) कशा देशभक्‍त आहेत, याच्‍या चर्चा रंगवल्‍या जात आहेत. हे आताच का, असं जर तुम्‍ही आम्‍ही विचारलं तर आपण नक्‍कीच देशद्रोही ठरणार आहोत. तसंच आताच्‍या कुंभमेळ्यात स्‍वच्‍छता कर्मचा-यांचे पाय धुणा-या पंतप्रधान मोदींनी 'स्‍वच्‍छ भारत मिशन'ची सुरुवात अशी का केली नाही, याचं उत्‍तरही आपल्‍याला कोणी देणार नाही आणि तुम्‍ही विचारण्‍याचं धाडस केलंच, तर....

WebTitle : marathi blog pulwama attack media coverage politics indian armed forces 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com