"मरण माझे मरून गेले, मज केले अमर"
ज्यांच्याविषयी अतीव आदर बाळगावा असे फार थोडे राजकारणी या देशाच्या राजकारणात उरलेत, त्यापैकी एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने गणपतराव होते. एकाच मतदारसंघातून एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना तत्वनिष्ठ आणि पारदर्शी राजकारणामुळे मिळाली. अंगावरती सदैव खादीचे पांढरे शुभ्र वस्त्र मात्र त्यावर भ्रष्टाचाराचा एक डाग त्यांनी कधी पडू दिला नाही. ज्या पक्षात राजकीय कारकीर्द सुरु केली त्याच पक्षात कायम राहून शेवटही त्याच पक्षात! निष्ठेचं मूर्तिमंत अन प्रेरणादायी उदाहरण आज खऱ्या अर्थाने त्यांना मानावे लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणात चारित्र्यसंपन्न, निष्कलंक आणि सत्वशील राजकारणी म्हणून गणपतराव देशमुख (आबांची) ओळख आजही आहे, अन ती कधीही पुसली जाणार नाही. मतदारसंघात त्यांना लोक आजही आबा या नावानेच संबोधतात. २००९ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत माळशिरस तालुक्यातील १४ गावे सांगोला विधानसभा मतदारसंघात होती. माझ्या निमगावचा देखील त्यात समावेश होता. त्यामुळे त्यांच्यासोबत सार्वजनिक जीवनात जवळजवळ दोन दशके काम करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. शेकापचे तत्कालीन सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते स्व.कृष्णराव पाटील आणि निमगावचे प्रभाकर पाटील हे त्यांचे मतदारसंघातील धडाडीचे कार्यकर्ते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली निमगावचा उपसरपंच ते सरपंच या दोन्ही पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली.
या सर्व कार्यकालादरम्यान गणपतरावांची काम करण्याची पद्धत मला जवळून अनुभवता आली. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अन गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून काम करणे हि त्यांची कार्यपद्धतीची होती. सोलापूर जिल्हा हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्ह्या अन त्यात सांगोला आणि माळशिरसचा काही भाग हा पिढ्यानपिढ्या दुष्काळाने होरपळून निघालेला ! अश्या भागाचे नेतृत्व गणपतरावांनी केले. याच दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून 'पाणी परिषदेच्या' माध्यमातून त्यांनी लढा उभा केला. नागनाथ अण्णा नायकवडी, भाई एन.डी.पाटील, जिडी बापू लाड अश्या मोठ्या नेत्यांची ताकद त्यांच्यासोबत होती. मतदारसंघातील गावांचा वेळोवेळी गावभेट दौरा, गावाला दिलेल्या वेळेआधी ते हजर राहणार एवढा कमालीचा वक्तशीरपणा ! गावात आल्यानंतर कोणीही सामान्य माणसानं उठाव अन त्यांच्याकडे समस्या मांडावी, काही काम सांगावं अन कोणी काही सांगताना त्याला कुठल्या कार्यकर्त्याने अटकाव केलाच तर गणपतराव त्यालाच म्हणायचे, "बोलूद्या त्यांना, मला जसा त्यांच्याकडे मत मागण्याचा अधिकार आहे; तसाच त्यांनाही त्यांचे प्रश्न माझ्याजवळ मांडण्याचा आणि त्यांची कामे मला सांगण्याचा अधिकार आहे".लोकप्रतिनिधीने लोकशाही दृढ करताना सार्वजनिक जीवनात, सूक्ष्म पातळीवर प्रत्यक्ष आचरण कसे ठेवावे याची अनुभूती देणारा प्रसंग मी जवळून अनुभवला आहे. हे फक्त आपल्या सभेत चालतं इतरांच्या सभेत असं चालत नाही. अशी मिश्किल टिपण्णीही ते करायचे.
मतदारसंघातील कोणत्याही सामान्य माणसाने आबांकडे प्रश्न घेऊन गेल्यानंतर ते स्वतः तातडीने त्याचा पाठपुरावा करायचे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून कामासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याच्या कार्यपद्धतीमुळे कामेही जलद व्हायची आणि यातून अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या बाबतीत एक आदरयुक्त दरारा देखील निर्माण झाला होता. त्यांच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त गेले कि, काम संपून माघारी जाताना ऑफिसमधील कर्मचारी प्रत्य्रेक व्यक्तीला थांबवून म्हणायचे थांबा चहा येतोय. चहा घेऊन जावा, नाहीतर आबासाहेब चौकशी करतात. सर्वसामान्य माणूस चहा पाणी घेतल्याशिवाय ऑफिसमधून बाहेर पडणार नाही असा अलिखित नियमच त्यांच्या ऑफिसमध्ये अनुभवायला मिळायचा.
कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जायची त्यांची वृत्ती आणि तत्परतेने काम करण्याची कार्यपद्धती आजच्या राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आत्मसात आणि अंगीकृत करण्याजोगी आहे. पक्षाचे एकाच गावात जर दोन गट असतील आणि काही वादविवाद होऊन एखादा गट परस्पर तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेलाच तर, एकेरी बाजू ऐकून न घेता दुसरा गट आल्याशिवाय मी यावर काही बोलणार नाही कारण हे न्यायिक ठरणार नाही हि त्यांची भूमिका असायची. राजकारणात नेत्याजवळ जाऊन स्वपक्षीयांनाच गटातटाच्या राजकारणात संपवणारे आपण अनेकजण पहिले असतील, त्याला हि कुरघोडवृत्ती कारणीभूत आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांनी गटातटाचे राजकारण टाळायचे असेल अन पक्षातील फूट टाळायची असेल तर दोन्ही बाजूंचा सापेक्ष विचार घेतला पाहिजे हाच त्यातला सहज सोपा संदेश गणपतरावांनी नेहमी दिला.
कुठलीही निवडणूक पार पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून, "माझं गाव आणि माझी माणसं म्हणून काम करत जा, राजकारण डोक्यात ठेवत जाऊ नका; गावची प्रगती होणार नाही" हि शिकवण आम्हाला त्यांच्याकडून मिळाली. त्यांच्या चांगुलपणाची, संयमी भूमिकेची आणि मूल्याधिष्ठित राजकारणाची कित्येक उदाहरणे देता येतील. आमच्या निमगाव गावच्या जडणघडणीत अन विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळात विविध विकास कामासाठी आमदार फंडातून वेळोवेळी भरीव मदत त्यांच्याकडून तात्काळ मिळाली. तब्बल ५ दशके यशस्वी राजकीय प्रवास आणि ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी केवळ याच लोकाभिमुक राजकारणाने सध्या केला. माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला असा नेता, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही !
~ सुभाष साठे
( लेखक सांगोला तालुक्यात २००९ पर्यंत समाविष्ट असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील निमगावचे माजी सरपंच आहेत )
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.