पवारांच्या आजच्या बैठकीमुळे काँग्रेस अस्वस्थ?

(अजय बुवा) महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबद्दल तर्कवितर्क लढविले जात असताना सरकारचे संकटमोचक असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी बनविण्याची रणनिती आखली आहे.
पवारांच्या आजच्या बैठकीमुळे काँग्रेस अस्वस्थ?
पवारांच्या आजच्या बैठकीमुळे काँग्रेस अस्वस्थ?- Saam TV
Published On

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रीय झालेल्या शरद पवार यांच्या पहिल्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जींच्या विजयात मोलाचा वाटा असलेले व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात राष्ट्रीय पातळीवर इतर विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये प्रशांत किशोर शरद पवार यांना पुन्हा एकदा भेटले.

दीड तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेचे मुद्दे गुलदस्त्यात असतानाच आज (ता. २२) पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि राष्ट्र मंच या नावाखाली राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राची प्रमुख व्यक्तींची बैठक होणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे देखिल पहा

शरद पवार यांच्या निकटवर्तीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्र मंच हा वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे व्यासपीठ असून त्यांच्या पुढाकाराने ही बैठक होत आहे. केवळ सोईचे ठिकाण म्हणून पवार यांचे निवासस्थान निवडले आहे. स्वतः शरद पवार यांनी ही बैठक बोलावलेली नाही, असा दावा या सुत्रांनी केला. या बैठकीमध्ये विद्यमान राजकीय परिस्थिती, देशाच्या अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था आणि कोरोना महामारीचे परिणाम यावर चर्चा होऊ शकते. यासाठी फक्त राजकीय पक्षांच्याच नव्हे तर अन्य क्षेत्रातील मंडळींचाही समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पवारांच्या आजच्या बैठकीमुळे काँग्रेस अस्वस्थ?
हे सरकार पाच वर्षे टिकणार- बच्चू कडू

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी या बैठकीत सहभागी होणाऱ्यांची यादी ट्विटद्वारे प्रसिद्ध केली आहे. यानुसार यशवंत सिन्हा, पवन वर्मा, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, भाकप सरचिटणीस डी. राजा, नॅशनल काॅन्फरन्सचे नेते डाॅ. फारुख अब्दुल्ला, न्या. ए. पी. शाह, जावेद अख्तर यासोबतच आशुतोष, मजिद मेमन, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंह, सुधींद्र कुलकर्णी, कोलिन गोन्साल्विस, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, घनश्याम तिवारी, प्रितीश नंदी, यांच्यासह काॅंग्रेसचे खासदार के. टी. एस. तुलसी आणि काँग्रेसमधून हाकलपट्टी झालेले माजी प्रवक्ते संजय झा यांचा समावेश आहे.

यासोबतच, नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती देताना शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध राजकीय पक्षांची बैठकही होणार असल्याचे म्हटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलवरही ही माहिती देण्यात आली आहे.

या बैठकीवर भाजपविरोधात काँग्रेसेतर पक्षांची आघाडी स्थापनेची चर्चा रंगली असताना काँग्रेसची अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसने अधिकृतपणे यावर भाष्य करण्याचे टाळले असले तरी ही बैठक राजकीय स्वरुपाची असल्याचे काँग्रेसला वाटते. यासाठी काँग्रेसला निमंत्रण का दिले नाही हे संयोजकांना विचारा, अशी टिप्पणी काँग्रेसच्या सुत्रांनी केली. तसेच पक्षाच्या सहभागाबाबत बोलण्याचे टाळले. मात्र, काँग्रेसचे खासदार असलेल्या के. टी.एस. तुलसी यांचा निमंत्रितांमध्ये समावेश असल्याकडे लक्ष वेधले असताना पक्षाचे अधिकृत म्हणणे त्यांना कळविले जाईल, असेही या नेत्याने स्पष्ट केले.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com