Blog: का घ्यावासा वाटतोय एकमेकांचा जीव...?, मानसोपचारतज्ज्ञ काय सांगतात?

जिवंत व्यक्तीला पेटवणे, गळा कापतो, डोक्यात दगड घालणे अशा विकृत भावना लोकांच्या मनात कशा येतात.
Crime
CrimeSaam Tv
Published On

मुंबई : राज्यात आज सकाळपासून तीन अशा घटना पुढे आल्या आहेत, ज्यामुळे लोकांना झालंय तरी काय, माणुसकी खरंच उरली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित राहात आहेत. विशेष म्हणजे आपण ज्या व्यक्तीला आपल्या जवळचं समजतो, तीच व्यक्ती आपल्यावर प्राणघातक हल्ला करते, ही कल्पनाच अंगावर शहारा आणणारी आहे. अशाच तीन घटना आज घडल्या आहेत. जिथे कुणी प्रियकराने प्रेयसीचा खून केलाय, तर पतीने पत्नीला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न केलाय. नेमक्या या घटना कुठे आणि कशा घडल्या पाहुयात (crime cases brutal murder cases increases) -

मुंबईत प्रियकराने महिलेचा गळा चिरला

मुंबई (Mumbai) डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकावर बसलेल्या महिलेचा गळा चिरुन तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हल्ला करणारी व्यक्ती ही महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहात होती. त्याने शेवटचे भेटण्यासाठी तिला बोलावले. त्यानंतर रेल्वे स्थानकावर कोणीही नाही हे पाहून त्याने महिलेच्या गळ्यावर चाकू फिरवला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. सुदैवाने या घटनेत महिला बचावली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर हल्लेखोर प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

Crime
Mumbai Crime: प्रेयसीला म्हणाला शेवटचं भेटायला ये आणि दगा करत केला चाकू हल्ला...

मुंबईत प्रियकराकडून डोक्यात खलबत्ता घालून प्रेयसीची हत्या

मुंबईच्या साकीनाका परिसरात घरकाम करणाऱ्या एका 29 वर्षीय मनिषा जाधव नावाच्या महिलेचा तिच्याच प्रियकराने खून केल्याची घटना घडली. प्रियकराने मनिषाच्या डोक्यात खलबत्ता टाकून आणि गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. मनिषा ही मागील तीन वर्षांपासून प्रियकर राजू निळे (वय 42) लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. राजू पहिल्या पत्नीला भेटायला गेला, हे समजल्यानंतर मनिषा आणि राजू यांच्यात वाद झाले. त्याच वेळी रागातून राजूने मनिषाला मारहाण केली. राजूने खलबत्याच्या रॉडने मनिषाला मारहाण केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजूला अटक केलीये.

Crime
Mumbai Crime: मुंबईत डोक्यात खलबत्ता मारून २९ वर्षीय मुलीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवलं

पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेणाऱ्या वृध्द पतीने पत्नीला पेटविल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडली. या घटनेने समाजमन सून्न झाले आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मुक्ताबाई गंगाराम शेंडे (65) असे मृत महीलेचं नाव आहे. आरोपी पती गंगाराम शेंडे (74) याला पोलिसांनी अटक केली आहे. मूल तालुक्यात सुशी गावात हे राहायचे. मुक्ताबाई या पहाटेच्या सुमारास सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सरपण घेऊन परत आल्यावर पती गंगाराम याने तिला बेदम मारहाण करत वाद उकरुन काढला. रागाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतले आणि पेटवले.

Crime
धक्कादायक : चारित्र्याच्या संशयावरून 74 वर्षीय पतीने बायकोला पेटवलं

वरील तीनही घटना या पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसीमधील प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहेत. लोकांची मानसिकता इतकी विकोपाला का जातेय, की ते इतक्या विकृत पद्धतीने एखाद्याला संपवतील. इतका राग, द्वेश का आहे लोकांच्या मनात? यामागील कारण काय? लोकांमधील संयम आणि विवेकबुद्धी कमी होतेय का? यासर्व विषयावर मानसोपचारतज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेऊया -

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी सांगतात, "सध्याच्या जगात माझ्या मान प्रमाणे झालंच पाहिजे, मला हवं ते तेव्हाच मिळालं पाहिजे, यातूनच समोरच्याचा नकार न पचवण्याची वृत्ती वाढत आहे. या घटनांमध्येही चारित्र्यावरील संशय हा एक मोठा भाग आहे. बऱ्याच वेळी हा एक मानसिक आजार असू शकतो. जो कदाचित घरातल्या किंवा आसपासच्या लोकांच्या लक्षात आलेला नसेल. या आजारांवर वेळेच्या वेळी उपचार घेतले नाही तर त्याचं रुपांतर अशा प्रकारच्या घटनांमध्ये होऊ शकते. समाजात सध्या असंतूलन वाढलं आहे. संयमशीलता कमी झाली आहे. तसेच, कित्येक प्रकारचे आर्थिक, सामाजिक ताण वाढत गेल्यानेही या आजारांची अशी स्फोटक रुपं जी दिसत आहेत ती वाढत चालली आहेत."

नैतिक मुल्यांच्या आधारे शिक्षणाची पुन्हा एकदा गजर निर्माण झालीये का?

"कोव्हिडच्या काळात शिक्षक त्यांच्यापरिने खूप प्रयत्न करत आहेत. पण, त्यांच्या हातातील साधनं खूप कमी आहेत. त्यामुळे मुलांना समोरासमोर जे शिक्षण दिलं जातं ते होत नाहीये. माणूस समोर नसेल तर अशावेळी बऱ्याचवेळेला मुलांमध्ये नैतिक मुल्य जागृत करणे हे शाळांमधूनही घडत नाही, घरांमधूनही मुलांवर हे संस्कार केले जात नाहीत. सध्या पुस्तकी ज्ञानापेक्षा इतर गोष्टीही त्यात सामावून घ्याव्या लागतील", असा सल्ला डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी दिलाय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com