राजकुमार देशमुख
स्वप्नील लोणकर या MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि MPSC च्या झालेल्या परिक्षांमधील उत्तीर्ण होऊनही नियुक्त्यांविना प्रलंबित असलेल्या उमेदवारांचे वास्तव समोर येऊ लागले. याचप्रकारे आजही अनेक स्वप्नील लोणकर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वप्नील गेला मात्र त्याच्यासारख्याच अनेक जणांच्या प्रश्नांना वाचा फोडून ! परंतु त्यांचा टाहो आत्महत्येनंतरच सरकार पर्यंत पोहचणार आहे का असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून आता विचारला जाऊ लागला आहे.
ऑगस्ट २०१७ मध्ये MPSC मार्फत 833 सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदासाठी मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेचा सुधारित निकाल सप्टेंबर २०१९ मध्ये लागला. कागदपत्र पडताळणीतून अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी अनुक्रमे जुलै आणि ऑगस्ट २०२० मध्ये प्रतीक्षा यादी जाहीर झाली. Appointments for MPSC exam 2017 are still pending!
हे देखील पहा -
यामध्ये गुणवत्तेच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या प्रतीक्षा यादीमध्ये नावच नव्हते आणि दुसऱ्या व तिसऱ्या प्रतीक्षा यादीतून शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी अनेक उमेदवार हे कागदपत्र पडताळणीनंतर अपात्र ठरले. त्यामुळे गुणवत्ता यादीत नाव न आलेले उमेदवार आणि प्रतीक्षा यादीतून अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी तिसरी प्रतीक्षा यादी MPSC कडून जाहीर होणे अपेक्षित होते.
दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० च्या अखेरीपासून संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शासन निर्णयानुसार अत्यावश्यक सेवेतील विभाग वगळता उर्वरित शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती शासनाकडून नियंत्रित केली गेली. त्यामुळे संबंधित मोटार वाहन विभागाकडून निकालानंतर एक वर्षाच्या आत सर्व 832 पदांवर उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नाही. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीकरता पुढील प्रतीक्षा यादी जाहीर करण्यासाठी MPSC कडे मुदतवाढ मागण्यात आली मात्र निकालानंतर एक वर्षाच्या आत नियुक्ती देण्याच्या नियमावर बोट ठेवून MPSC कडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही.
कोरोना महामारीच्या संकटामुळे उर्वरित जागांसाठी प्रतीक्षा यादी लावताना मोटार वाहन विभाग आणि MPSC यांच्यात योग्य समन्वय न झाल्याने त्याचा थेट परिणाम हा नियुक्त्यांवर झाला आहे. परीक्षा पास, पण हातात नियुक्ती नाही ! अशी गत विद्यार्थ्यांची झाली आहे. शासनाने जरी उर्वरित नियुक्त्या देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष कोणत्या कारणामुळे नियुक्त्या रडखडल्या आहेत हे शोधून त्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे.
कोरोना महामारी आणि त्यामुळे शासकीय कार्यालयांना असणारी टाळेबंदी यांचा परिणाम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या आयुष्यावर होऊ देऊ नये. अन्यथा पुन्हा अनेक उमेदवारांनी स्वप्नील लोणकर सारखा पर्याय निवडला तर नवल वाटायला नको. २०१७ साली झालेल्या या परीक्षेच्या सर्व जागा तातडीने भराव्या यासाठी शासन आणि प्रशासन यांनी MPSC सोबत योग्य समन्वय ठेवून प्रलंबित उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्यात.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.