पंकजा मुंडे की धनंजय मुंडे?

पंकजा मुंडे की धनंजय मुंडे?

परळीत धनंजय मुंडे यांच्या बाजूने झुकताना दिसत असलेला निकाल बदणार का? हीच एक चर्चा निवडणुकीच्या आदल्या दिवशी ऐकायला मिळाली. परळी सध्या एखादं नाट्यकेंद्र बनलयं, असं म्हणायला हरकत नाही. धनंजय मुंडेंनी त्यांच्या ताईबद्दल म्हणजे विद्यमान मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडेंबद्दल केलेल वक्तव्याचा संदर्भ वाईटचं होता की नाही, याबद्दल अनेक तर्क-वितर्क आहेत. तो अर्थ वाईट असेल तर धनंजय मुंडेंच समर्थन करुच नये. पण या संपूर्ण निवडणूक प्रचारात पंकजा मुंडेंवर नाटकीपणाचा शिक्का अजूनच गडद झाला. एवढेचं नाही तर त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या नाकर्तेपणाच्या आरोपात भरच पडली. मुख्यमंत्री वगैरेसारख्या चर्चा तर दूरची गोष्ट. जी आता इतिहासातली चर्चा बनली आहे.

 या निवडणुकीत राज्यात सर्वात हायव्होल्टेज वातावरण असलेला मतदारसंघ कुठला असेल तर तो आहे परळी. जिथे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा थेट सामना आहे. पंकजा या भाजपचे लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या, तर धनंजय मुंडे हे पंकजाचे चुलतबंधू व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते. राज्यात सर्वात जास्त तणावाचे वातावरण या मतदारसंघात असल्याचे सुरक्षायंत्रणातील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे बहुदा सर्वाधिक पोलिसफाटा इथेच तैनात करण्यात आलायं. 

भाजपच्या या बालेकिल्ल्यात मुंडे कुटुंबातीलचं धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात इथे भाजपसमोर मोठे आव्हान उभे केलेयं. विरोधी पक्षनेतेम्हणून त्यांचा अधिवेशनाच्या काळात सभागृहात दणाणणारा आवाज तर महाराष्ट्राला माहितीच आहे. पण त्यांनी मतदारसंघ बांधणीसाठी केलेली मेहनत त्यांच्या मतदारसंघात चक्कर मारल्यावर दिसून येते. आमची विधानसभेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर गेलेली टीम सांगत होती, राज्यात सर्वाधिक वाईट रस्त्यांचा अनुभव त्यांना तिथे आला. रस्ते नाहीत, पाण्याचा प्रश्न, ऊसतोड कामगारांचे न सोडवलेले प्रश्न सगळं जसेच्या तसेच आहे. मग पंकजा मुंडेंनी केलं काय? असा प्रश्न उपस्थित होतो. तिथला एक स्थानिक पत्रकार सांगत होते, मोदी येणार म्हणून ठराविक रस्त्यांवर मुरम टाकला होता. संपूर्ण महाराष्ट्र पंकजा मुंडेंना परळीचा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखतो. ओळखतो म्हणण्यापेक्षा बातम्यांमधून ऐकतो. त्यात 'मुंडे साहेबांची लेक' यापलीकडे काहीच ऐकायला मिळत नाही. कायम भावनिक भाषण. पंकजा मुंडे म्हटलं की महाराष्ट्राला त्यांचं मोठमोठ्या आवाजातलं भावनिक भाषण डोळ्यासमोर यावं, अशी परिस्थिती. 

याऊलट धनंजय मुंडेंनी गेली पाच वर्ष संपूर्ण जिल्हा पालथा घातला. सतत ते लोकापर्यंत जात आहेत. त्यांना शक्य तितकी मदत करत आहे. त्यांच्याशी बोलत आहे. कायम संपर्क सुरु आहे. त्यांनीही पंकजा मुंडेंसारखी भावनिक भाषणं केली नाही, असे मूळीच नाही. त्यांनी त्यांच्या शैलीत भावनिक वक्तव्य केलीच. पण लोकांना धनंजय मुंडे त्यापलीकडे ज्ञात व्हावेत असा जाणीवपूर्वक प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला. एका चॅनलचे एक वरिष्ठ पत्रकार मतदानाच्या आदल्या दिवशी गोपीनाथ गडावर गेले, तिथे त्यांनी पंकजांची चॅनलसाठी प्रतिक्रिया घेतली. त्यानंतर माझे त्यांच्याशी बोलणे झाले, लोकांची काय भावना आहे या भाषण प्रकरणानंतर? त्यांनी काही उदाहरणे सांगितली. तिथे एका मतदाराला विचारलं.. तो म्हणाला, 'धनुभाऊ व पंकजाताई या दोघांनाही आम्ही आज ओळखत नाही. गेली अनेक वर्ष ओळखतो. पण धनुभाऊ कधी खासगीतही पंकजाताईबद्दल वाईट बोलत नाही. सन्मानानेच नाव घेतात.' एका इस्त्रीवाल्याचे मतदानाबद्दलचे मत असे होते, 'मला धनुभाऊंनी घर उभारायला मदत केली.'. आणखी एका-दोघांनी धनंजय मुंडेचा उल्लेख मदतीबद्दलचं केला.   

परळीला जाऊन आलेल्या सर्वांचे म्हणणे हे 'हवा बदलतेय' हेच होते. त्यामुळेच पंकजा आणि संबंधित घडामोडींबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहतेय. सारखं सारखं गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलणं, अमित शहांनी जिल्ह्यात सभा घेणं, पंकजा मुंडेंना चक्कर येणं, धनंजय मुंडेंच्या वक्तव्य प्रकरणानंतर पंकजांनी गोपीनाथ गडावर जाणं आणि त्यांच्या फेसबुक पेजवरुन गोपीनाथ गडावरील दर्शन LIVE करणं...या साऱ्यावर "नाटक" म्हणूनचं छाप मारली जातेय. 


धनंजय मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन कुठल्याच प्रकारे करता येणार नाही. पण त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन प्रश्नांची उत्तर द्यावीत. मुलींना पळवून आणण्याची भाषा कऱणाऱ्या राम कदमांना उमेदवारी देण्याबद्दल त्यांचं काय मतं? शेतकऱ्यांना 'साल्या' म्हणाऱ्या दानवेंबद्दल काय मत? भाजपच्या वाचाळवीरांची यादी खूप मोठी आहे…

Web Title : Blogg On Pankaja Munde And Dhananjay Munde By Sonali Shinde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com