संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावी लिलाव बंद पाडला

 संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावी लिलाव बंद पाडला
Published On

नाशिक - कांदा निर्यातबंदीनंतर केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी काही ठिकाणी लिलाव बंद पाडून सरकारचा निषेध नोंदविला. कांद्याला बाजारात मागणी असतानाही भाव का पाडले जात आहेत, असा जाब विचारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कांदा प्रश्नांवर शासनाच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील उमराणे, कळवण, विंचूर, लासलगाव, निफाड, विंचूर, सटाणा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व कांदा मालाचे लिलाव ३५०० ते ४००० रुपयांप्रमाणे झाले पाहिजेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली. केंद्राच्या कारवाईच्या धास्तीने बाजारभाव कमी पुकारला गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावी लिलाव बंद पाडला. निफाडमध्ये रास्ता रोको केला. उमराणे येथे शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर येत रोष व्यक्त केला. 

अट शिथिल करा : व्यापारी
घाऊक व्यापाऱ्यांना ५०० क्विंटल व किरकोळ व्यापाऱ्यांना १०० क्विंटल खरेदी करण्याच्या सूचना आहेत. मात्र हा निर्णय केल्याने कांदा बाहेर पाठविताना अडचण येईल असे व्यापारी सांगतात. कांदा खरेदी केल्यानंतर त्याची हाताळणी, प्रतवारी व वितरण यामध्ये अधिक काळ जातो. यासाठी वेळ अधिक लागत असल्याने सरकारने किमान पाठवण्याचा कालावधी निश्चित धरून ही अट काही प्रमाणात शिथिल करावी, अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी केली.

अधिकृत निर्णय प्राप्त नाही... 
केंद्र सरकारच्या ग्राहक सेवा मंत्रालयाने कांदा व्यापाऱ्यांच्या खरेदीनंतर साठवणुकीत काही निर्बंध असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सांगितले, की व्हॉट्सॲपवर अशी सूचना पाहण्यात आली. मात्र आमच्याकडे अधिकृत शासकीय सूचना प्राप्त नाही.

परिस्थितीनुसार आत्तापर्यंत राज्य सरकार कांदासाठ्यावर बंदी घालत होते. मात्र, पहिल्यांदाच देशभरात बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरकारने आधीच निर्यातबंदी करून दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले आहेत.
- रामविलास पासवान, केंद्रीय ग्राहक कल्याणमंत्री 

व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
केंद्रीय ग्राहक सेवा मंत्रालयाने कांदा साठवणुकीवर देशभर मर्यादा घातल्याने व्यापारी बॅकफूटवर आले आहेत. या संदर्भात कोणतेही स्पष्ट आदेश न मिळाल्याने प्रशासन अनभिज्ञ असल्याचे चित्र होते. मात्र, व्यापाऱ्यांनी कारवाईच्या धास्तीने स्वतःहून व्यवहार ५०० क्विंटलदरम्यान मर्यादित केल्याचा परिणाम बाजारावर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.  

Web Title: Angry farmers onion auction closed

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com