आयपीएल २०२७ स्पर्धा सुरू होण्याआधीच ती चर्चेत आली आहे. कारणही तसंच आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या पंजाब किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला. मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांचे मार्ग वेगवेगळे झालेत. हार्दिकऐवजी मुंबईनं अर्शदीपला संघात घेतलं आहे. गेल्या तीन मोसमात संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पंजाबच्या संघात गेल्यानंतर कर्णधार कोण होणार, असा प्रश्न विचारला जातोय. रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करावं, अशी चाहत्यांची मागणी आहे. पण रोहितसोबत आणखी तिघे कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेआधीच ती ट्रेडिंगमुळं चर्चेत आली आहे. हार्दिक पंड्या मुंबईतून बाहेर पडला आहे. पंजाब किंग्जच्या ताफ्यात तो दाखल झालाय. मागील तीन मोसमात हार्दिकनं मुंबईचं नेतृत्व केलं होतं. आता हार्दिकच संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळं मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा याचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय अन्य तीन खेळाडूही या शर्यतीत आहेत. रोहितनं नेतृत्व करताना संघाला आयपीएलची पाच जेतेपदे मिळवून दिली आहेत. त्यामुळे रोहित यातही बाजी मारू शकतो, असा अंदाज आहे.
रोहित शर्मा याच्या कर्णधारपदाच्या काळात मुंबईनं पाच आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. त्यामुळं त्याची प्रचंड क्रेझ आहे. चाहत्यांच्या तर गळ्यातला ताईत बनलाय. २०२४ च्या स्पर्धेआधी रोहितला हटवून हार्दिकला कर्णधार केलं होतं. त्यामुळं चाहते प्रचंड नाराज झाले होते. आता हार्दिकनंतर पुन्हा रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं, असं मानलं जातंय. मुंबईचा हेड कोच पोलार्ड आणि रोहित हे आयपीएलमध्ये बरीच वर्षे एकत्र खेळत आहेत. त्यामुळं त्यांच्या अनुभवाचा फायदा संघाला होऊ शकतो. २०२० पासून आयपीएल जेतेपदाचा पडलेला दुष्काळ हे दोघे उत्कृष्ट संघबांधणी करून दूर करू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रोहित शर्मानंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत तिलक वर्माचं नाव घेतलं जातंय. सध्या तो भारतीय टी २० संघाचा कर्णधार आहे. तिलकनं २०२२ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल पदार्पण केलं होतं. काही वर्षांपासून तो सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षी आशिया चषकाच्या फायनलमध्ये नाबाद ६९ धावा करून पाकिस्तानला पराभूत करण्याची किमया साधली होती. त्यानं दलिप ट्रॉफीमध्ये साऊथ झोनचं नेतृत्व केलं होतं. संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याची भूमिका महत्वाची होती.
तिलक वर्मा हा कामगिरीत सातत्य दाखवत असला तरी, अनुभव आणि गेम सेन्स, लोकप्रियतेच्या बाबतीत तो रोहितच्या बराच मागे आहे. त्यामुळं रोहितला कर्णधार करून तिलककडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. या दोघांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचीही नावे चर्चेत आहेत. सूर्यकुमारच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी २० वर्ल्डकप जिंकला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा अनुभव त्याच्याकडे आहे. यापूर्वी हार्दिकच्या अनुपस्थितीत काही सामन्यांत मुंबई इंडियन्सची धुरा देखील सांभाळली आहे. जसप्रीत बुमराह हा देखील अनुभवी खेळाडू आहे. त्यानेही काही सामन्यांत संघाचं नेतृत्व केलंय. त्यामुळे या दोघांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.