नाशिकच्या दिलीप महादू गावितची राष्ट्रकुल पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी.
पुरुषांच्या १०० मीटर T47 प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
दिलीप गावितने १०.७१ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली.
नाशिकमधील एका छोट्या गावातील आणि प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या दिलीप महादू गावितने मोठी मजल मारलीय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिलीप गावितनं सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम प्रस्थापित करत देशाचे नाव उंचावले आहे. दिलीप गावित हे नाव आधी कोणी ऐकलनं नसेल. परत त्याच्या सुवर्ण कामगिरीनं भारतीय क्रीडा विश्वात त्याचे नाव सुवर्णक्षरांनी कोरले गेलंय.
दिलीप महादू गावित याने कॉमनवेल्थ पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतील पुरुषांच्या १०० मीटर T४७ प्रकारात १०.७१ सेकंदांचा विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत भारतालाच आणखी एक पदक मिळाले असून मोहम्मद बासिल मोर्सिंगनकाथ यांनी रौप्यपदक जिंकलंय. अंतिम शर्यतीनंतर दिलीप याने सांगितले की, त्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. पहिले ६० मीटरपर्यंत तो आघाडीवर नव्हता. मात्र शेवटच्या ४० मीटरमध्ये वेग वाढवत त्याने सर्वांना मागे टाकत सुवर्णपदक जिंकलं. पावसामुळे ट्रॅक ओला असल्याने धावपटूंना अडचणींचा सामना करावा लागला. तरीही दिलीप याने शांतपणे शर्यत पूर्ण करत विक्रमी वेळ नोंदवला.
नाशिक जिल्ह्यात तोरण डोंगरी हे छोटसे गाव आहे. याच गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिलीपनं सुवर्ण इतिहास लिहिला आहे. दिलीप लहानपणापासूनच शेतीकामात आई-वडिलांना मदत करायचा. आर्थिक परिस्थिती बेताची होती, पण मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत मात्र त्यांच्यात होती. दिलीप अवघा पाच ते सहा वर्षांचा असेन त्यावेळी त्याच्यासोबत एक अपघात घडला. झाडावरून पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
गावात योग्य वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. जखमेमुळे संसर्ग वाढत गेला. त्यामुळे डॉक्टरांना कोपराखालचा हात कापण्याचा निर्णय घ्यावा लागला. लहान वयात हात गमावणे कोणासाठीही मोठा धक्का असू शकतो. पण दिलीप यांनी या संकटाला शरण न जाता त्यालाच आपल्या यशाची प्रेरणा बनवलं.
हात गमावल्यानंतरही त्यांनी धावण्याची आवड सोडली नाही. गावातील कच्च्या रस्त्यांवर कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय तो नियमित सराव करू लागला. त्यांची क्षमता सर्वप्रथम प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी ओळखली. काळे यांनी केवळ त्यांना प्रशिक्षणच दिले नाही, तर त्यांच्या कुटुंबालाही खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं. सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण, राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्चही त्यांनी उचलला. दिलीप गावितला सुरुवातीला ४०० मीटर T४७ प्रकारासाठी तयार करण्यात आले. २०२३ मध्ये त्याने आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर दिलीपने पॅरालिम्पिकमध्येही सहभाग घेतला. आता १०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकत त्याने आणखी एक ऐतिहासिक यश मिळवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.