आयपीएल २०२७ च्या आधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमच्या प्रशिक्षकांच्या टीममध्ये मोठे बदल झाले आहेत. सोमवारी चेन्नईने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या कोचिंग स्टाफमधील पाच जणांना निरोप दिल्याची माहिती दिली. यामध्ये टीमचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांचाही समावेश आहे. याआधी २०२६ च्या सिझननंतर चेन्नईने मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याशीही फारकत घेतली होती. आता त्यांच्या जागी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
फ्लेमिंग यांच्यानंतर आता चेन्नईच्या कोचिंग स्टाफमधील आणखी पाच जणांचा प्रवास थांबला आहे. या पाच जणांनी अनेक वर्षे टीमसाठी काम केलं असून, खेळाडूंची तयारी आणि कामगिरी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये त्यांच्या टीमसोबतच्या जुन्या आठवणी आणि योगदानाचा उल्लेख करण्यात आला. हसी हे २००८ मध्ये आयपीएलचा पहिला सिझन सुरू झाल्यापासून चेन्नई टीमशी जोडलेले होते. त्यांना धन्यवाद देताना टीमने लिहिलंय, "२००८ मध्ये पहिल्या सिझनपासूनच तुम्ही चेन्नई सुपर किंग्स परिवाराचा अविभाज्य भाग राहिला आहात."
पुढे पोस्टमध्ये म्हटलंय, "पिवळ्या जर्सीतील तुमचा प्रवास केवळ तुम्ही केलेले रन्स किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडूंपुरता मर्यादित नाही, तर या फ्रँचायझीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे दाखवलेलं समर्पण, नम्रता आणि बांधिलकी यांमुळेही तो ओळखला जातो. आमच्यासाठी तुमचं स्थान नेहमीच खास राहणार आहे, हसमिस्टर."
चेन्नईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी सांभाळणारे एरिक सिमन्स यांनाही टीमने निरोप दिलाय. ते २०१८ पासून चेन्नईच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. गोलंदाजांना तयार करणं आणि गेल्या काही वर्षांत टीमला मिळालेल्या यशात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
सिमन्स यांच्यासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये चेन्नईने म्हटलंय, "२०१८ पासून चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग सेटअपचा महत्त्वाचा भाग असलेल्या एरिक सिमन्स यांनी आमची गोलंदाजीची फळी तयार करण्यात आणि गेल्या काही वर्षांत टीमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावलीये. तुमच्या समर्पित सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद, एरिक सिमन्स. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा."
चेन्नईच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणारे राजीव कुमार हे देखील आता टीमसोबत दिसणार नाहीत. टीमच्या तयारीपासून ते खेळाडूंच्या विकासापर्यंत आणि कामगिरी सुधारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. खेळाडूंसोबत काम करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि टीमचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.
त्यांच्या योगदानाबद्दल चेन्नईने पोस्टमध्ये म्हटलंय, "चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग सेटअपमधील एक महत्त्वाचे सदस्य म्हणून राजीव कुमार यांनी गेल्या काही वर्षांत टीमची तयारी, विकास आणि कामगिरी यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. तुम्ही दाखवलेलं समर्पण हा आमच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. धन्यवाद, राजीव कुमार. तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा."
चेन्नई सुपर किंग्सचे फिजिओ टॉमी सिमसेक यांचाही या पाच जणांमध्ये समावेश आहे. ते टीमच्या पहिल्या सिझनपासून म्हणजेच २००८ पासून पडद्यामागे काम करत होते. खेळाडू तंदुरुस्त राहावेत आणि सामन्यांसाठी तयार असावेत यासाठी त्यांनी अनेक वर्षे मेहनत घेतली. चेन्नईने आपल्या पोस्टमध्ये जुन्या काळातील 'डॅड्स आर्मी'चाही उल्लेख केला. या टीमतील अनुभवी खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यात टॉमी यांचं योगदान महत्त्वाचं होतं.
चेन्नईने स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच ग्रेग किंग यांच्याशीही आपला प्रवास थांबवला आहे. खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढवणं, त्यांना कठीण सामन्यांसाठी तयार करणं आणि संपूर्ण सिझनमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहावी यासाठी ग्रेग किंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आयपीएल २०२७ च्या आधी चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल झालेत. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्यानंतर आता मायकेल हसी, एरिक सिमन्स, राजीव कुमार, टॉमी सिमसेक आणि ग्रेग किंग यांनीही टीमला निरोप दिला आहे. झहीर खान यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली असून, आगामी सिझनसाठी मोहित शर्मा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.