वादळापूर्वीची शांतता काय असते हे संजू सॅमसनच्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या खेळीनं अख्ख्या जगानं बघितलं. करो या मरो सामन्यात सॅमसननं संयमी पण तितकीच विस्फोटक ९७ धावांची खेळी केली. त्यामुळे नॉक आऊट सामन्यात भारताला विजयाची चव चाखता आली. भारताच्या युवा शिलेदारांचा संघ टी २० वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराहनं वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयाचा टर्निंग पॉइंट सांगितला, पण त्यानं भारताला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या संजू सॅमसनचं नाव न घेता दुसऱ्याच खेळाडूचं नाव घेतलं. दुसरीकडं हेड कोच गंभीरनंही याबाबत वेगळं मत व्यक्त केलं.
संजू सॅमसनच्या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडीजला पाच विकेट्सने पराभूत करून सेमिफायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली. वेस्ट इंडीजनं पहिली फलंदाजी करताना भारताला १९६ धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं २० व्या षटकात ते आव्हान पार केलं. सलामीवीर सॅमसन यानं ५० चेंडूंत नाबाद ९७ धावा कुटल्या. त्यानं १२ चौकार आणि ४ षटकार लगावले. तो सामनावीर ठरला. पण जसप्रीत बुमराहच्या मते सामन्याचा टर्निंग पॉइंट हा सॅमसनची खेळी नाही तर शिवम दुबेने लगावलेले दोन चौकार होते. दुबे याने ४ चेंडूंत नाबाद ८ धावा केल्या.
बुमराहने वेस्ट इंडीजच्या विरोधात प्रभावी गोलंदाजी केली. ४ ओव्हरमध्ये त्यानं ३६ धावा देत दोन महत्वाच्या विकेट घेतल्या. सामन्यानंतर आयसीसीशी बोलताना बुमराहला सामन्याच्या टर्निंग पॉइंटबद्दल विचारणा केली. त्यावर दुबेने जे दोन चौकार लगावले, तोच टर्निंग पॉइंट ठरला. कदाचित दुबेने लगावलेल्या त्या दोन चौकारांचे क्रिकेट बुक्स किंवा आकड्यांत काही महत्व नसेल, पण ज्या लोकांना क्रिकेट समजतं, त्यांच्या नजरेत नक्कीच त्याच्या किंमत अधिक आहे, असे बुमराह म्हणाला.
दुबे याने लगावलेल्या दोन चौकारांमुळं अखेरच्या ओव्हरमध्ये संघावरचं दडपण कमी झाले. कधी-कधी अखेरच्या ओव्हरमध्ये ८-९ धावा सुद्धा कठीण असतात. हार्दिक पंड्या १७ धावांवर बाद झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या दुबेने जोसेफला तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूंवर चौकार लगावले. त्यामुळे भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त ७ धावा हव्या होत्या. अखेरची ओव्हर रोमारियो शेफर्ड यानं टाकली. सॅमसननं पहिल्याच चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
बुमराहनंतर हेड कोच गौतम गंभीर यानंही दुबेचं कौतुक करताना त्यानं लगावलेल्या दोन चौकारांचा उल्लेख केला. तुम्ही सर्वांच्या योगदानाबाबत बोलत आहात याचा विशेष आनंद वाटतो. कारण अनेक वर्षांपासून आपण केवळ काही विशिष्ट योगदानाबाबतच बोलत आलो आहोत. पण हा एक टीम गेम आहे आणि कायम टीम गेम राहील. माझ्यासाठी शिवम दुबेने लगावलेले चौकार जितके महत्वाचे, तितकेच महत्वाच्या संजूच्या ९७ धावा आहेत. जर त्याने दोन चौकार लगावले नसते, तर कदाचित कोणी त्या ९७ धावांबाबत बोललंही नसतं. मोठ्या योगदानाची नेहमी चर्चा होते. मात्र, छोटं योगदान सुद्धा महत्वाचं असतं. कारण ते संघाला विजय मिळवून देण्यात मदतगार ठरलेलं असतं. त्यामुळे जोपर्यंत मी या पदावर आहे, तोपर्यंत आमची हीच रणनीती असणार आहे, असेही गंभीर म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.