सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला.
दीप्ती शर्माने 4 षटकांत 10 धावा देत 5 बळी घेत शानदार गोलंदाजी केली.
दीप्तीच्या कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ 106 धावांत गारद झाला.
एजबॅस्टन येथे झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ मधील 'गट अ' (Group A) मधील सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अफलातून कामगिरी करत ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयात भारतीय महिला संघाची फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या चार षटकांत केवळ १० धावा देत ५ बळी घेतले. या सामना-विजेत्या कामगिरीसाठी तिला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.
पाकिस्तानच्या महिला संघाविरुद्ध अवघ्या १० धावांत ५ बळी घेऊन दीप्ती शर्मा आता टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. या कामगिरीसह दीप्तीने रेणुका सिंगचा तीन वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. रेणुका सिंगने २०२३ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १५ धावांत ५ बळी घेतले होते.
'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार स्वीकारताना दीप्ती शर्माने भगवान हनुमानाचे स्मरण केले आणि अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करायला आपल्याला खूप आवडतं. या कामगिरीचे संपूर्ण श्रेय संघाला जाते. हनुमानजी महान आहेत. मला आयसीसी (ICC) स्पर्धा खूप आवडतात, कारण तिथूनच माझी सुरुवात झाली होती. या खेळपट्टीवर चेंडू चांगला वळत होता, त्यामुळे मी प्रत्येक षटकात माझ्या गोलंदाजीच्या गतीत थोडा बदल केल्याचं दिप्ती शर्मा सामना झाल्यानंतरच्या सादीकरणात बोलताना म्हणाली.
महिला टी-२० विश्वचषक सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीची कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडू:
दीप्ती शर्मा – १० धावांत ५ बळी (विरुद्ध पाकिस्तान, २०२६)
रेणुका सिंग – १५ धावांत ५ बळी (विरुद्ध इंग्लंड, २०२३)
प्रियांका रॉय – १६ धावांत ५ बळी (विरुद्ध पाकिस्तान, २००९)
डायना डेव्हिड – १२ धावांत ४ बळी (विरुद्ध श्रीलंका, २०१०)
पूनम यादव – १९ धावांत ४ बळी (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२०)
महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने केवळ पाकिस्तानविरुद्ध धावांच्या फरकाने आपला सर्वात मोठा विजयच नोंदवला नाही, तर स्पर्धेच्या इतिहासातील आपला पाचवा सर्वात मोठा विजयही मिळवला. या यादीत २०२४ च्या टी-२० विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाने ८२ धावांनी मिळवलेला विजय अग्रस्थानी आहे. या दणदणीत विजयासह भारतीय महिला संघाने गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे; सध्या ते २ गुण आणि ३.२०० च्या 'नेट रन रेट'सह 'गट अ' (Group A) मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा महिला संघ अव्वल स्थानावर आहे—त्यांच्याही खात्यात २ गुण आहेत—परंतु त्यांचा 'नेट रन रेट' ३.२५० इतका सरस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.