आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताने नेहमीप्रमाणे पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यावर पाठ फिरवली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जिद्दिवर अडून आहे. त्यांचं म्हणणं आहे की, भारतीय संघाला पाकिस्तानात यावच लागेल. तर दुसरीकडे बीसीसीआयने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दरम्यान आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने मोठा दावा केला आहे.
बासित अली म्हणाला की, ' इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारखे क्रिकेट बोर्ड बीसीसीआयसमोर नतमस्तक झाले आहेत. हे तेच करतात, जे जय शहा सांगतात. हे सर्व बीसीसीआयसमोर शेपूट हलवतात.'
' असे ५-६ क्रिकेट बोर्ड आहेत जे जय शहाचं ऐकतात आणि शेपूट हलवतात. जर जय शहा त्यांना म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार, तर ते होकार देतील. त्यांनी हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला तरीदेखील ते या निर्णयाचा डोळे बंद करून स्वीकार करतील. ' असं बासित अली म्हणाला.
बासित अली यांनी बीसीसीआय आणि जय शहा यांच्यावर एकापेक्षा एक मोठे आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारखे क्रिकेट बोर्ड आयपीएलमुळेच बीसीसीआयचं ऐकून घेतात. बीसीसीआय खेळाडूंना पैसे देतं. यासह बासित अलीने क्रिकेट बोर्डवर मोठा आरोप केला आहे. त्याचं म्हणणं आहे की, बीसीसीआय क्रिकेट बोर्डला देखील पैसे पुरवत असेल, म्हणून हे क्रिकेट बोर्ड त्यांच्या होकारात होकार देतात.
यापूर्वी देखील आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पूर्ण जोर लावला. मात्र शेवटी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवावी लागली. या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.