कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय ज्युडोपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. 23 वर्षीय अस्मिता डे आणि 23 वर्षीय हर्ष सिंह यांनी आपापल्या गटात गोल्ड मेडल जिंकत भारतीय ज्युडोसाठी नवा अध्याय लिहिलाय. विशेष म्हणजे या दोघांच्या सुवर्णपदकांमध्ये अवघ्या 30 मिनिटांचं अंतर होतं.
सर्वप्रथम महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अस्मिता डे हिने कॅनडाच्या हेडी क्वाचचा अतिशय चुरशीच्या गोल्डन स्कोअरमध्ये पराभव केला आणि सुवर्णपदक जिंकलं. या विजयासह कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
1990 मध्ये ऑकलंडमध्ये प्रथमच कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्युडोचा समावेश पदक स्पर्धेत करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी अनेक पदकं जिंकली, मात्र सुवर्णपदकाची प्रतीक्षा कायम होती. अखेर तब्बल 36 वर्षांनंतर अस्मिताने ही प्रतीक्षा संपवत भारतीय ज्युडोच्या इतिहासात आपलं नाव कोरलंय.
अंतिम सामन्याच्या सुरुवातीलाच अस्मितावर दबाव दिसून आला. तिने सुरुवातीला एक 'युको' गमावला. त्यानंतर तिला एक पेनल्टीही मिळाली त्यामुळे कॅनडाच्या हेडी क्वाचला आघाडी मिळाली. मात्र अस्मिताने हार मानली नाही. संयम राखत तिने जोरदार कमबॅक केलं. सामना गोल्डन स्कोअरपर्यंत गेला आणि अखेर निर्णायक क्षणी बाजी मारत तिने सुवर्णपदकावर नाव कोरलं.
अस्मिताच्या ऐतिहासिक विजयाच्या अवघ्या 30 मिनिटांनंतर भारताच्या हर्ष सिंहनेही सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला. पुरुषांच्या 60 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी ज्युडोपटू जोशुआ कॅट्झचा पराभव केला. या विजयासह कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारा हर्ष हा भारताचा पहिला पुरुष खेळाडू ठरला.
हर्षसाठी ही पहिलीच कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा होती. तरीही त्याने संपूर्ण सामन्यात संयम, आत्मविश्वास आणि अचूक रणनीतीचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं. त्याचा प्रतिस्पर्धी जोशुआ कॅट्झ हा सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. बराच वेळ दोघांमध्ये चुरशीची लढत झाली आणि कोणालाही स्पष्ट आघाडी मिळाली नाही.
सामना संपायला अवघे 41 सेकंद बाकी असताना हर्षने 'वाझा-आरी' मिळवत निर्णायक आघाडी घेतली. ही आघाडी त्याने अखेरपर्यंत कायम राखली आणि भारताला आणखी एक ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिलं.
अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचंही अभिनंदन केलंय. त्यांच्या या यशामुळे भारतीय ज्युडोला नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी नमूद केलं.
अस्मिता डेचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ती त्रिपुरातील दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामधील रहिवासी आहे. तिचे वडील सायकल दुरुस्तीचे काम करत होतं. घरची आर्थिक परिस्थिती साधी असतानाही अस्मिताने मेहनतीच्या जोरावर ज्युडोमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
सुरुवातीला ती 800 मीटर धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होती. मात्र तिच्या पहिल्या प्रशिक्षकाने दिलेल्या सल्ल्यानंतर तिने ज्युडोकडे वळण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये ती त्रिपुरा स्पोर्ट्स स्कूलमध्ये दाखल झाली आणि तिथून तिच्या यशस्वी प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.