देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सध्या हावडा-कामाख्या मार्गावर धावतेय. बीईएमएलनंतर आता आणखी एक कंपनी, रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), स्वतःची वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करतेय. या ट्रेनचं पहिलं प्रोटोटाइप जून 2026 पर्यंत तयार होणार आहे, अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र आता या प्रोटोटाइपच्या निर्मितीसाठी डिसेंबर 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सुमारे 14,400 कोटी रुपयांच्या खर्चातून आरव्हीएनएलकडून 120 वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पामध्ये पुढील 35 वर्षांसाठी ट्रेनची देखभाल आणि दुरुस्ती यांचाही समावेश करण्यात आलाय. एसपीव्ही कायनेट रेल्वे सोल्यूशनच्या सहकार्याने हे काम सुरू असून, पहिलं प्रोटोटाइप डिसेंबर 2026 मध्ये तयार होण्याची अपेक्षा असल्याची माहिती आरव्हीएनएलचे व्यवस्थापकीय संचालक सलीम अहमद यांनी दिली.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी 120 ट्रेनसेटच्या निर्मितीचं काम सुरू असल्याचं सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पहिलं प्रोटोटाइप भारतीय रेल्वेकडे सुपूर्द करणं. त्यावेळी हे काम जून 2026 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र जून महिना सुरू झाला असतानाही हे प्रोटोटाइप अद्याप तयार झालेलं नाही. त्यामुळे प्रवाशांना आता आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरव्हीएनएल आणि कायनेट रेल्वे सोल्यूशन संयुक्तपणे या प्रोटोटाइपवर काम करत आहेत. या प्रकल्पांतर्गत 16 डब्यांच्या 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. या सर्व ट्रेनमध्ये मिळून एकूण 1,950 कोच असणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या निर्मितीसाठी तीन वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट दिलं आहे. यामध्ये बीईएमएल, कायनेट रेल्वे सोल्यूशन आणि टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड व भारत हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड यांचा समावेश आहे.
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बीईएमएलने चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केली होती. या ट्रेनचं उद्घाटन जानेवारी 2026 मध्ये हावडा-कामाख्या-हावडा मार्गावर करण्यात आलं.
भारत आणि रशियातील कंपन्या संयुक्तपणे दुसऱ्या वंदे भारत स्लीपर प्रोटोटाइपवर काम करत आहेत. 15 ऑक्टोबर 2025 रोजी या ट्रेनची संकल्पना सादर करण्यात आली होती. या ट्रेनमधील नव्या फर्स्ट एसी चार-बर्थ डब्यांमध्ये अधिक मोकळी जागा आणि प्रवाशांना अधिक आराम मिळावा यावर विशेष भर देण्यात आला आहे.
तसंच वरच्या बर्थवर जाण्यासाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक सीटवर यूएसबी पोर्ट, वाचनासाठी स्वतंत्र दिवा आणि सामान ठेवण्यासाठी अतिरिक्त जागाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दरम्यान, देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई-बंगळुरू मार्गावर धावणार असल्याची माहिती समोर आलीये. ही ट्रेनदेखील बीईएमएलनेच तयार केली असून नुकतीच ती बंगळुरूतील एका रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाली होती.
त्यामुळे मुंबई ते बंगळुरू या मार्गावर लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील प्रवाशांना आधुनिक सुविधा, अधिक आरामदायी प्रवास आणि जलद रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.