Saudi Prince dead: लंडनमधील एका आलिशान हॉटेलमध्ये गेल्या वर्षी मृतावस्थेत आढळलेल्या सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील 29 वर्षीय राजकुमार अब्दुल्ला बिन फहाद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ बिन जलावी अल सौद यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. कोरोनर चौकशीनुसार, मद्य आणि विविध अमली पदार्थांच्या मिश्रणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. न्यायालयाने या मृत्यूची नोंद 'मिसॲडव्हेंचर' (अपघाती मृत्यू) अशी केली असून, आत्महत्या किंवा घातपाताचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
ही घटना 25 नोव्हेंबर 2025 रोजी लंडन मॅरियट हॉटेल केन्सिंग्टन येथे घडली होती. एका रात्रीचे सुमारे 600 पाउंड( ७७ हजार रुपये) भाडे असलेल्या या आलिशान हॉटेलमधील त्यांच्या खोलीचे दार आतून बंद असल्याचे साफसफाई कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने आपत्कालीन सेवांची मदत घेतली. मात्र, वैद्यकीय पथकाने घटनास्थळी पोहोचूनही राजकुमारांना वाचवता आले नाही.
पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या रक्तात दारूचे प्रमाण प्रति 100 मिलीलीटरमागे 222 मिग्रॅ इतके आढळले, जे इंग्लंडमधील वाहन चालकांना असलेल्या मर्यादेपेक्षा जवळपास तिप्पट होते. याशिवाय शरीरात GHB (पार्टी ड्रग), गांजाचे अंश, झॅनॅक्सची उच्च मात्रा आणि इतर औषधांचेही अंश आढळले. तज्ज्ञांच्या मते, या सर्व पदार्थांच्या एकत्रित परिणामामुळे त्यांचे हृदय बंद पडले. त्यांना अन्य कोणतेही आजार नव्हते.
चौकशीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी राजकुमारांनी दारू आणि प्रिस्क्रिप्शन औषधांच्या व्यसनमुक्तीसाठी उपचार घेतले होते. त्यांनी लंडनमधील प्रायरी हॉस्पिटलमध्ये डिटॉक्स उपचार पूर्ण केले होते. हॉटेलमधील परिस्थिती आणि इतर पुराव्यांची पडताळणी करण्यात आली. राजकुमार मृत्यूच्या आदल्या रात्री एकटेच हॉटेलमध्ये आल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले. खोलीत जबरदस्तीने प्रवेश, झटापट किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे कोरोनरने हा मृत्यू पूर्णपणे अपघाती असल्याचा आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.