Rahul Gandhi protest outside Election Commission office : देशाची राजधानी दिल्लीत आज राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या सर्व प्रमुख खासदारांनी आज संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत जोरदार मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या आंदोलनात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक वरिष्ठ खासदार सहभागी झाले होते.
पोलिसांनी १०० मीटर आधीच रोखले, राहुल-प्रियंका रस्त्यावरच बसले
विरोधकांचा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जात असताना, दिल्ली पोलिसांनी मुख्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरच मोठा बंदोबस्त लावून मोर्चा अडवला. पोलिसांनी रस्ता अडवल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर सर्व खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार आंदोलन सुरू केले.
यावेळी विरोधकांनी "व्होट चोर, गद्दी चोर" आणि "ज्ञानेश कुमार राजीनामा द्या" अशा जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपच्या पापाचा घडा आता भरला, विरोधकांचे गंभीर आरोप
निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचे काम केले आहे, त्याविरोधात आज राहुल गांधींच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचे हे आंदोलन थांबणार नाही, असे इमरान प्रतापगढी म्हणाले.
संवैधानिक संस्थांचा आणि लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागत आहे. भाजपच्या पापाचा घडा आता भरला असून जनता आता त्यांना रस्त्यावर धावून उत्तर देईल, असा हल्लाबोल राजीव राय यांनी केला. तर
जया बच्चन म्हणाल्या की, आम्ही कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने करतो. गणेशजी कधीही चुकीच्या कामात साथ देत नाहीत. तेच आता आमचे आणि लोकशाहीचे रक्षण करतील.
भाजपचा पलटवार: राहुल गांधींना लॉन्च करण्यासाठी लोकशाहीवर हल्ला
विरोधकांच्या या मोर्चावर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. संबित पात्रा म्हणाले, विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेसकडून देशात सत्ता पालट करण्यासाठी आणि राहुल गांधींना कसेही करून खुर्चीवर बसवण्यासाठी एक पुरस्कृत (Sponsored) प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी भारतातील लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर जाणीवपूर्वक हल्ले केले जात आहेत. हे काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले नसून अनेक वर्षांपासून चालू आहे.
पात्रा पुढे म्हणाले, सुरुवातीपासूनच काँग्रेस राहुल गांधींना लॉन्च आणि री-लॉन्च करण्याचे प्रयत्न करत आहे. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा राहुल गांधी लॉन्च होऊ शकले नाहीत, तेव्हा आता काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी भारतातील लोकशाहीवर हल्ला करायचे ठरवले आहे. देशात अराजकता पसरवावी लागली तरी चालेल, पण राहुल गांधींना कसेही करून लॉन्च करायचेच असे ठरवलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.