पंजाब - विधानसभेत शहीद-ए-आझम भगत सिंग आणि संविधान निर्माते भीमराव आंबेडकर यांचे पुतळे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय भगत सिंग यांच्या शहीद दिनीही सरकारी सुट्टी असेल. पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मंगळवारी विधानसभेत ही घोषणा केली. त्यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला, तो मंजूर झाला आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी 23 मार्चला शहीद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनी सुट्टी जाहीर केली आहे. हा निर्णय 23 मार्चपासून लागू होणार आहे. 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिली होती. त्यानंतर हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
यादरम्यान काँग्रेस आमदार प्रताप बाजवा यांनी विधानसभेत महाराणा रणजित सिंह यांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मांडला. महाराजांना आधुनिक पंजाबचे शिल्पकार मानले जाते. पाकिस्तानातील लाहोरमध्येही त्यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यापूर्वी भगवंत मान यांनी २३ मार्च रोजी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. याद्वारे कोणतीही व्यक्ती लाचखोरीची किंवा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार व्हॉट्सअॅपवर त्यांच्या नंबरवर करेल. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगताना भगवंत मान म्हणाले की, पंजाबच्या इतिहासात आजपर्यंत असा निर्णय झाला नव्हता.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भगवंत मान यांनी शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलां येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांनी गृह आणि न्याय विभाग स्वतःकडे ठेवला आहे, तर हरपाल सिंग चीमा यांच्याकडे वित्त खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.