व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागल्यामुळं लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपप्रणित सरकारवर तिखट हल्ला चढवलाय. निवडणुकांनंतर महागाई वाढेल, असा इशारा आधीच दिला होता, असंही राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्यानंतर केंद्रातील सरकारवर हल्लाबोल केला. व्यावसायिक सिलिंडरची किंमत एकाच दिवसात ९९३ रुपयांनी वाढली आहे. हे 'निवडणूक बिल' असल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीपासून आतापर्यंत व्यावसायिक एलपीजीच्या किंमती १३८० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांत जवळपास ८१ टक्क्यांची उसळी घेतलीय, असे राहुल म्हणाले.
एलपीजी किंमत वाढल्यानं याचा थेट परिणाम लहान व्यावसायिकांवर होईल, असं राहुल गांधी म्हणाले. चहा विक्रेते, ढाबा, हॉटेल, बेकरी आणि मिठाई प्रत्येकाच्या किचनवर त्याचे ओझे वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या थाळीपर्यंत त्याची झळ बसेल. कारण पदार्थांच्या किंमती वाढू शकतात. ही फक्त सुरुवात आहे, असे सांगतानाच, पहिला हल्ला गॅसवर केला आहे, आता पुढील हल्ला हा पेट्रोल - डीझेलवर होऊ शकतो, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी महागाईच्या संकटाचा इशारा दिलाय.
यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही एक्सवर पोस्ट केली होती. निवडणुका संपल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार वेळ न दवडता एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करेल, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती जवळपास हजार रुपयांनी वाढल्या आहेत. त्याचा कोट्यवधी भारतीयांना फटका बसेल. ढाबे, हॉटेलमधील जेवणावर जे अवलंबून आहेत, त्यांना त्याची झळ बसेल.
तत्पूर्वी, एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. शुक्रवारपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसह ५ किलो एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलिंडरही महागलं आहे. ५ किलोच्या एलपीजी सिलिंडर २६१ रुपयांनी वाढले आहे. नवे दर तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.