Mowgli Girl saam tv
देश विदेश

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेशातील कतर्नियाघाट जंगलातून 2017 मध्ये सापडलेली ‘मोगली गर्ल’ एहसास हिचं वयाच्या 18 व्या वर्षी निधन झालं. अनेक वर्षांच्या पुनर्वसन आणि उपचारांनंतर तिचा जीवनप्रवास संपला असून तिची कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जवळपास दहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील कतर्नियाघाटच्या दाट जंगलातून सापडलेल्या एका रहस्यमय मुलीची कहाणी संपूर्ण देशाने पाहिली होती. जंगलात एकटीच भटकताना सापडलेली ही मुलगी अनेकांसाठी खऱ्या आयुष्यातील ‘मोगली गर्ल’ ठरली होती. मात्र आता या मुलीचा जीवनप्रवास संपला आहे. ‘एहसास’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुलीचं 15 जून रोजी लखनऊच्या डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या १८ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला आहे.

2017 मध्ये जंगलात सापडली होती

जानेवारी 2017 मध्ये बहराइच जिल्ह्यातील कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्याच्या मोतीपूर परिसरातील रस्त्यावर ही मुलगी एकटी फिरताना दिसली होती. ती मानवी समाजापासून जवळपास पूर्णपणे दूर राहिल्यासारखी होती. तिचं वागणं पाहून डॉक्टर, अधिकारी आणि स्थानिक लोकही चकित झाले होते.

ती लोकांना घाबरत होती, कपडे घालण्यास नकार देत होती, चार पायांवर चालत होती, प्राण्यांसारखे आवाज काढत होती आणि सामान्य मानवी व्यवहारांची तिला फारशी समज नव्हती. त्यामुळे अनेकांनी तिची तुलना लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या प्रसिद्ध ‘मोगली’ पात्राशी केली आणि तिला ‘मोगली गर्ल’ म्हणून ओळख मिळाली.

‘पूजा’ ते ‘एहसास’ असा झाला प्रवास

सुरुवातीला बहराइचमधील बालकल्याण समितीने या मुलीला ‘पूजा’ हे नाव दिलं होतं. मात्र नंतर मोहान रोडवरील निर्वाण राजकीय बालगृह विशेषीकृतमध्ये (NRBGV) तिचं नाव बदलून ‘एहसास’ ठेवण्यात आलं. बहराइच जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर एप्रिल 2017 मध्ये तिला निर्वाण फाउंडेशनमध्ये आणण्यात आलं. फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश सिंह धपोला यांनी सांगितलं की, तिथल्या कर्मचारी माया आणि रेनू यांच्या काळजीमुळे तिच्या पुनर्वसनाची चिन्हं दिसू लागली.

हळूहळू घडू लागले बदल

सुरुवातीला लोकांसमोर येताना ती स्वतःला चादरीने झाकू लागली. नंतर तिने कपडे घालण्यास सुरुवात केली. आधार घेत उभे राहण्याचाही प्रयत्न करू लागली. मात्र ती बोलू शकत नव्हती आणि लोकांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याचं टाळत होती. तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे राणी. राणीने तिला मुलीसारखे प्रेम दिलं आणि खूप संयमाने तिचा विश्वास जिंकला. वर्षानुवर्षांच्या प्रेम आणि काळजीमुळे एहसास हळूहळू आसपासच्या लोकांना ओळखू लागली. ती राणीला प्रेमाने ‘अम्मा’ म्हणू लागली होती.

‘ती मला अम्मा म्हणायची’

एहसासच्या निधनानंतर भावूक झालेल्या राणी म्हणाल्या, “ती मला अम्मा म्हणायची. मला वाटत होतं की ती एक दिवस पूर्णपणे बरी होईल. पण आता तिच्या आठवणीच आमच्याकडे उरल्या आहेत.”

मेंदूचा विकास पूर्ण न झाल्याने अनेक अडचणी

सुरेश सिंह धपोला यांच्या मते, अनेक वर्षे पौष्टिक आहार, औषधं आणि सातत्यपूर्ण काळजी मिळाल्यामुळे तिच्या जीवनमानात सुधारणा झाली होती. मात्र बालपणीच्या काळात झालेल्या गंभीर दुर्लक्षाचा परिणाम तिच्यावर कायम राहिला. तपासणीत डॉक्टरांना तिच्या मेंदूचा विकास खूप कमी झाल्याचं आढळलं होतं. तिला वारंवार फिट्स येत होत्या. अनेक वर्षे तिच्यावर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. एहसास आज आपल्यात नाही, पण तिच्या आठवणी कायम जिवंत राहतील.

मृत्यूचं कारण काय?

एहसासच्या पोस्टमार्टम अहवालानुसार, फुफ्फुसांच्या आजारामुळे झालेला सेप्टिसीमिया (रक्तामध्ये संसर्ग पसरल्याने निर्माण होणारी गंभीर अवस्था) हे तिच्या मृत्यूचं मुख्य कारण ठरलं. गाझीपूरच्या एसीपी अनिंद्य विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एहसास काही काळापासून गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते.

8 जून रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तिला राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने 11 जून रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र काही दिवसांतच तिची तब्येत पुन्हा बिघडली. 15 जून रोजी तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुमारे 40 टक्क्यांपर्यंत घसरल्याचं पुनर्वसन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर तिला तातडीने लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यात थरारक दुहेरी मृत्यू; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती महिन्याचे पैसे जमा, वाचा महत्त्वाची अपडेट

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

SCROLL FOR NEXT