Kolkata hotel fire 9 people killed latest news : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची भीषण घटना घडली. या आगीत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेले बहुतांश नागरिक हे उपचारासाठी कोलकात्यामध्ये आलेले बांगलादेशी नागरिक होते. धुरामुळे गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना हॉटेलमध्ये आग भडकली. अचानक ही आग लागल्याने हॉटेलमध्ये मोठा गोंधळ आणि पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू केले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशामक दल या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मध्यरात्री २ वाजता मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली होती. पण ती आग इतकी वाढली की जवळच्या अनेक हॉटेल्समध्ये पसरली. घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अहवालानुसार, ही आग एअर-कंडिशनरच्या स्फोटामुळे लागली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. पण आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि अखेरीस आगीवर नियंत्रण मिळवले. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा कोलकाता येथील हॉटेलला आग लागली आहे. तारापीठ येथील हॉटेल विदेशिनीला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता.