जमशेदपूरच्या मरीन ड्राइव्हवर पहाटे भीषण अपघात
भरधाव कार रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रेलरच्या मागील भागावर आदळली
या दुर्घटनेत कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू
मृतांमध्ये झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीचा समावेश
झारखंडमधील जमशेदपूर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. सोनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरीन ड्राइव्हवर हा अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रेलरच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कार ट्रेलरच्या मागच्या भागात अक्षरशः अडकली आणि कारचा चक्काचूर झाला. धक्कादायक म्हणजे या अपघातातील मृतांमध्ये झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीचा तृषा सिंहचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
एसडीओ अर्णव मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेलर हा बिघडला असल्यामुळे बुधवारी रात्री सुमारे १० वाजल्यापासून रस्त्यावर उभा होता. गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कार ट्रेलरच्या मागच्या बाजूला धडकली. या धडकेत कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच डीएसपी सीसीआर मनोज ठाकुर, सोनारी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय सुमन यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. कारची अवस्था अत्यंत खराब झाल्याने गॅस कटरच्या मदतीने वाहन कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख सार्थक अग्रवाल, नमन गुप्ता, वंशिका खंडेलवाल आणि तृषा सिंह अशी करण्यात आली आहे.मृतांमधील तृषा सिंह ही झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे यांची मुलगी असल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात कारचा वेग अधिक असणे आणि पहाटेच्या अंधारामुळे रस्त्यावर उभा असलेला ट्रेलर चालकाला वेळेत न दिसणे ही संभाव्य कारणे समोर आली आहेत. मात्र, अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे जमशेदपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस अपघाताच्या सर्व बाजूंचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.