गुजरातमधील गांधीनगरमध्ये बुधवारी बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडलीये. गांधीनगरच्या कुडासन परिसरातील ‘बॉस्की द एम्पायर कमर्शियल मॉल’मध्ये बांधकाम सुरू असताना मोठा स्लॅब अचानक खाली कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू करण्यात आला. बचाव पथकांकडून अतिशय काळजीपूर्वक ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू होतं. जेणेकरून आत कोणी अडकलं असल्यास त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल.
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांकडून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशनला आणखी वेग देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
दरम्यान अग्निशमन विभागाचे कर्मचारी विपुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 11 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलंय. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अहमदाबादहूनही बचावकार्य करण्यासाठी गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. गांधीनगर आणि अहमदाबादमध्ये पथकं मिळून बचावकार्य करत होती.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितलं की, कुडासनच्या ‘बॉस्की द एम्पायर कमर्शियल मॉल’मध्ये बांधकाम सुरू असताना मोठा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचावकार्य सुरू करून अडकलेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
संघवी यांच्या माहितीनुसार, एकूण 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी तीन जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. तर 12 जण जखमी झाले असून त्यापैकी काही जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणाचीही प्रकृती सध्या गंभीर नाही.
हर्ष संघवी यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री यांनी सर्व संबंधित विभागांना जखमींना योग्य उपचार आणि आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळावी, असे निर्देश दिलेत. राज्यातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, साइट मॅनेजरने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आता कोणीही अडकलेले नसल्याची माहिती दिली आहे. मात्र, ढिगारा पूर्णपणे हटवला जात नाही तोपर्यंत बचाव आणि शोधमोहीम सुरू ठेवली जाणार असल्याचे संघवी यांनी स्पष्ट केलंय. बचावकार्य सुरू असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अग्निशमन विभागाचे कर्मचारी विपुल यांनी सांगितले की, 11 जणांना आतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आलंय. बचाव आणि शोधमोहीम अजूनही सुरू आहे. शोधकार्य पुढे गेल्यानंतरच ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले होते, याची अचूक माहिती मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सुरुवातीला इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. प्रशासनाकडून बचावकार्याला प्राधान्य देण्यात आले असून, ढिगारा पूर्णपणे हटवल्यानंतरच या दुर्घटनेतील नुकसानीची आणि जखमींची अंतिम स्थिती स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.