भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय सैन्यदलातील निवृत्त लेफ्टनंट जनरल श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांचं निधन झालंय. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात रविवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पूर्व उत्तर प्रदेशातील देवरिया परिसरात शोक व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिलीये.
श्रीप्रकाश मणि हे देवरिया सदर मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. १९९६ आणि १९९९ मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. राजकारणासोबतच सैन्यदलातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांचा मुलगा आणि देवरिया सदरचे विद्यमान खासदार शशांक मणि त्रिपाठी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी घटना... माझे वडील, देवरियाचे माजी खासदार आणि देशाचे ज्येष्ठ सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांचं आज सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी दिल्लीत निधन झालं.
वडिलांना गमावणं म्हणजे माझ्यासाठी केवळ वडिलांना गमावणं नाही तर माझ्या आयुष्यातील एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपणं आहे. ते नेहमीच माझ्यासाठी आधार होते. त्यांचे प्रेम, शिस्त, देशाप्रती असलेली निष्ठा आणि लोकांची सेवा करण्याची भावना या गोष्टी माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहेत. आज एक मुलगा म्हणून माझ्याकडे व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. पण त्यांनी दिलेले संस्कार आणि शिकवण कायम माझ्यासोबत राहतील,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुढे त्यांनी लिहिलंय, वडिलांचं संपूर्ण आयुष्य देशसेवा, कर्तव्य आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणात गेलंय. देवरियातील जनतेशी त्यांचं जवळचं नातं होतं. त्यांचा साधेपणा आणि लोकांमधील लोकप्रियता कायम लक्षात राहील. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, संस्कार आणि त्यांनी केलेल्या कामांचा वारसा कायम जिवंत राहील.
त्याचप्रमाणे ईश्वराने त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि कुटुंबीय, नातेवाईक तसंच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. 'बाबा, तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या आठवणी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहतील. ॐ शांती. भावपूर्ण श्रद्धांजली,' असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांचे पार्थिव शरीर देवरियाला आणण्यात येणार आहे. त्यांचा मुलगा आणि खासदार शशांक मणि त्रिपाठी यांनी सोशल मीडिया पोस्टमधून ही माहिती दिली. पार्थिव शरीर देवरियाला आणण्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलंय.
याच वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. ही भेट अचानक ठरली होती. त्यामुळे पूर्वांचलच्या राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरू झाली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या दिवशी देवरियामध्ये सभा घेतली होती. त्यानंतर ते गोरखपूरला पोहोचले. तिथे त्यांनी अचानक श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा झाली होती. या भेटीमागे नेमकं काय कारण असावं याबाबतही अनेक तर्क लावले जात होते.
श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केलंय. 'देवरियाचे माजी खासदार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्रीप्रकाश मणि त्रिपाठी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. प्रभू श्रीरामांनी दिवंगत आत्म्याला शांती द्यावी आणि दुःखात असलेल्या कुटुंबीयांना हे मोठं दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करतो. ॐ शांती,'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.