What is El Niño and how does it affect : ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील वेगाने होणाऱ्या बदलांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. यातच आता हवामानातील एका मोठ्या संकटाने शास्त्रज्ञांच्याही धडकी भरवली आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यानंतर आता 'अल नीनो' (El Nino) अधिक आक्रमक रूप धारण करून हिवाळ्यावरही संकट आणणार आहे.
जागतिक हवामान संघटना (WMO) आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीने जारी केलेल्या अहवालानुसार, आगामी काळात अल नीनोचा प्रभाव आणखी तीव्र होणार आहे. भारतासह जगभरात त्याचे अत्यंत भयानक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ‘डबल अटॅकमुळे’ यंदाच्या हिवाळ्यात थंडी गायब होऊन कडक ऊन किंवा विषम हवामानाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
यंदा पावसाने पाठ फिरवली. तब्बल १३ टक्के कमी पाऊस पडलाय. याच हवामान बदलामुळे हिवाळ्यात तापमान वाढेल का? पावसाच्या चक्रात व्यत्यय येईल का? शेतीवरील ताण वाढेल का? याची चिंता सर्वसामान्यांना भेडसावत आहे. एल निनोचे परिणाम जगाच्या जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणवत आहेत. हिवाळ्यातही अल नीनोचा भयंकर प्रभाव जाणवू शकतो. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) अहवालानुसार, मागील काही महिन्यांपासून एल निनो सातत्याने अधिक तीव्र होत आहे. तो २०२६ च्या अखेरपर्यंत अधिक तीव्र होऊ शकते आणि त्याचे परिणाम २०२७ पर्यंत टिकू शकतात, असा इशारा डब्ल्यूएमओने दिला आहे.,
हवामानातील या अचानक बदलामुळे पुढील काळात जगभरातील विविध भागांमध्ये तापमान वाढणं, अनियमित पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे. अधिक तीव्र होत जाणारा 'अल नीनो' मान्सूनमधील पावसाच्या तुटवड्याचा परिणाम अधिक गंभीर करेल का? ही भारतापुढील सर्वात मोठी चिंता आहे. तसेच येत्या काही महिन्यांत तो हिवाळ्यातील तापमान, पाऊस आणि शेतीवर कसा परिणाम करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'अल नीनो' भारताच्या हवामानावर कसा परिणाम करतो?
भारताच्या बाबतीत 'अल नीनो'वर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जाते. कारण या हवामान बदलामुळे नैऋत्य मान्सून दरम्यान भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा मोठा धोका असतो. पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान असामान्यपणे वाढल्यामुळे जागतिक स्तरावरील वाऱ्यांचा वेग आणि वातावरणातील अभिसरण (Circulation Pattern) बदलते. या बदलांमुळे भारतीय मान्सूनला अनुकूल असणारी आणि पाऊस आणणारी हवामानाची नैसर्गिक परिस्थिती लक्षणीयरीत्या कमकुवत होते. मान्सून कमकुवत झाल्यामुळे देशात पावसाची मोठी कमतरता भासते आणि दीर्घकाळ चालणारा दुष्काळ पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते.
हिवाळ्यात तापमान वाढण्याची शक्यता
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान दक्षिण आशियातील बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहू शकते, असा अंदाज WHO ने वर्तवला आहे. हिवाळ्याच्या शेवटी (अखेरीस) होणारी तापमानवाढ गव्हाच्या पिकासाठी घातक ठरू शकते. गव्हाच्या लोंब्यांमध्ये दाणे भरण्याचा काळ (Grain filling stage) असतो, त्यावेळी जर तापमान वाढले तर उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका आहे. तापमानवाढीचा प्रत्यक्ष आणि नेमका काय परिणाम होईल, हे त्या काळात असणाऱ्या स्थानिक हवामानावरच अवलंबून असेल. येत्या काही महिन्यांत एल निनोचा वाढता प्रभाव भारताच्या जलसंपदा, कृषी उत्पादन आणि अन्नसुरक्षेसाठी एक मोठी परीक्षा ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.