निशू आझादच्या वडिलांवरील हल्ल्याचे प्रकरण
सीजेपीचे दिल्ली पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन
संजय कुमार हल्ला प्रकरणात सीजेपीची कारवाईची मागणी
स्वतंत्र भारद्वाजविरोधात कारवाईसाठी सीजेपी आक्रमक
निशू आझाद आणि तिच्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टी आज पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे. नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्याबाहेर सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या निशू आझाद या तरुणीचे वडील संजय कुमार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीजेपी हे आंदोलन करत आहे. स्वतंत्र भारद्वाज नावाच्या एका तरुणाने संजय कुमार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाजविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. त्याच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सीजेपी नेते सौरभ दास इतर सदस्यांसह पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. निशू आणि तिचे वडील संजय यांना न्याय मिळावा अशी मागणी सीजेपीने केली आहे.
सीजेपी आंदोलनात सहभागी झालेली निशूनेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून राहुल गांधींकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी निशूला मदतीचे आश्वासन दिले. आता सीजेपीने निशू आणि त्याच्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. निशू, चंद्रशेखर आझाद, सौरभ दास आणि आशुतोष रांका हे डीसीपी कार्यालयात पोहोचले आहेत. आरोपी स्वतंत्र भारद्वाजने एका पॉडकास्टमध्ये सीजेपी कार्यकर्ती निशूच्या वडिलांवरील हल्ल्याची उघडपणे कबुली दिली तेव्हा हे प्रकरण पुन्हा तापले. त्याने सांगितले की, राजकीय व्यक्तींशी संबंध असल्यामुळे हल्ल्यानंतरही तो तुरुंगात गेला नाही.
या घटनेनंतर राहुल गांधी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, निशू, घाबरण्याची गरज नाही. मी तुझ्यासोबत आहे. हे स्पष्ट आहे की तू तुझ्या समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवतेस म्हणून तुला लक्ष्य केले गेले. एकीकडे अमित शाह यांचे दिल्ली पोलिस विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करतात. दुसरीकडे, एका दलित मुलीच्या वडिलांवर हल्ला करणारा गुन्हेगार मोकाट फिरत आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे सदस्य अशा गुन्हेगाराचे संरक्षण का करत आहात? अजूनही कारवाई होणार की तुम्ही दुसऱ्या कोणाचे तरी संरक्षण करत राहणार?'0 निशू, तुझा लढा एकटीचा नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. जय भीम. जय संविधान.'
सीजेपी नेते आशुतोष रांका यांनी सांगितले की, जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान निशूचे वडील संजय यांच्यावर हल्ला झाला होता. आम्ही सातत्याने न्यायाची मागणी करत आहोत. दिल्लीतील परिस्थिती अशी आहे की, गुन्हेगार उघडपणे आपले गुन्हे कबूल करत आहे तरीही दिल्ली पोलिसांनी भाजपच्या सांगण्यावरून कोणतीही कारवाई करत नाही. आम्ही निशू आणि त्याच्या वडिलांसोबत आहोत. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असेल.' दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये संजय कुमारवर हल्ला केल्याची कबुली देणाऱ्या आरोपी स्वतंत्र भारद्वाजने आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याने जे काही केले ते केवळ आत्मसंरक्षणासाठी केले होते. पॉडकास्टमधील त्याच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.