Gold Mine Accident saam tv
देश विदेश

Gold Mine Accident: सोन्याच्या खाणीत अचानक दरड कोसळली, 100 हून अधिक जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक मजूर अडकले

Gold Mining Disaster: मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बेकायदा सोन्याच्या खाणीत दरड कोसळून किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कॅमेरून सीमेजवळील झांबोये परिसरात बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या सोन्याच्या खाणीत मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. खाणीत दरड कोसळून किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. ही घटना कॅमेरूनच्या सीमेजवळ घडली. दुर्घटनेनंतर बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

ही दुर्घटना मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधील झांबोये खाण परिसरात झाली. हे ठिकाण बाबुआ शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. या मोठ्या खुल्या खाणीत त्यावेळी शेकडो खाणकाम करणारे मजूर काम करत होते. दरड कोसळल्यानंतर अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बाबुआच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा सुमारे 100 आहे. मात्र, बचावकार्य बुधवारीही सुरू असल्याने मृतांची नेमकी संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. दुर्घटनेतील एका खाण कामगाराने सांगितलं की, अचानक जमीन पूर्णपणे खचली आणि त्याखाली अनेक लोक गाडले गेले.

बाबुआच्या सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत काम सुरू असलेल्या अनेक भूमिगत बोगद्यांचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन तपासही सुरू करण्यात आला आहे.

बाबुआचे निवडून आलेले अधिकारी लॉरेंट नगॉन बाबा यांनी सांगितलं की, सध्या मृतांचा अधिकृत आकडा सांगणं कठीण आहे. बचाव पथकांकडून अजूनही शोधमोहीम सुरू असल्याने परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच मृतांची अंतिम संख्या समोर येईल.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी किमान चार जण कॅमेरूनचे नागरिक असल्याचं कॅमेरून ट्रिब्यूनने म्हटलंय. त्यामुळे या दुर्घटनेच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी एकत्र काम करत आहेत.

या घटनेनंतर मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधील बेकायदा आणि अनियंत्रित खाणकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. हा देश खनिज संपत्तीने समृद्ध आहे. मात्र, सरकारी नियंत्रणाबाहेर सुरू असलेल्या अनेक खाणींमध्ये दरड कोसळणं आणि खाणींचे बोगदे खचणं यासारख्या दुर्घटना वारंवार घडतात.

मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधील ‘मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ द सेंट्राफ्रिकन पीपल’ या पक्षाचे अध्यक्ष मार्टिन झिगेले यांनी या दुर्घटनांसाठी सरकारला जबाबदार धरलंय. सरकारच्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कॅमेरूनमधील विरोधी पक्षनेते मॉरिस काम्टो यांनीही खाण कामगारांच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. बेकायदा पद्धतीने खनिजांची कमाई करणाऱ्यांमुळे मजुरांना अमानुष परिस्थितीत काम करावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलंय. गरिबीमुळे काम करण्यास भाग पडलेल्या नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही आणि अनेक अनधिकृत खाणकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे काम्टो यांनी सांगितलं.

मध्य आफ्रिकन रिपब्लिक आणि कॅमेरूनच्या सीमेवरील भागात खाण दुर्घटनांची ही पहिली घटना नाही. जून महिन्यात बे-मबारीच्या सोन्याच्या खाणीत अशाच प्रकारे खाण कोसळली होती. त्या दुर्घटनेत अनेक डझन लोकांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी मार्चच्या मध्यात मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या पश्चिम भागातील नगौरूममध्ये खाणीत दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीमध्ये देशाच्या ईशान्य भागातील गोर्डीमध्ये झालेल्या खाण दुर्घटनेत 20 जणांना जीव गमवावा लागला होता.

कॅमेरूनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशात 200 हून अधिक कंपन्या आवश्यक परवाना किंवा अधिकृत परवानगी नसतानाही खाणकाम करत आहेत. कॅमेरूनने 2023 मध्ये नवीन खाण कायदा लागू केलाय. देशातील सोने, हिरे, लोखंड, बॉक्साइट आणि कोबाल्ट यांसारख्या खनिज संपत्तीचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे इस्कॉन च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Bank Holiday: पुढील 10 दिवसांत 6 दिवस बँका बंद; कोणत्या राज्यात कधी? वाचा तारीख

दुधाचा की कोरा; मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता चहा बेस्ट?

CJP Attack : सरकारी शाळेची पोलखोल करायला गेलेल्या CJP टीमवर जीवघेणा हल्ला, Video व्हायरल

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ कॅरेटचे ताजे दर

SCROLL FOR NEXT