मणिपूरच्या राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी समोर आली आहे. राज्यातील पाटसोई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सपम कुंजकेश्वर सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पहाटे नवी दिल्ली येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे.
सपम कुंजकेश्वर सिंह यांनी २००७ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा पाटसोई मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०२२ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान त्यांच्या आकस्मिक निधनाने मणिपूरच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे.
राज्याचे राज्यपाल अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह, उपमुख्यमंत्री लोसीई दिको, काँग्रेसचे नेते कीशम मेघचंद्र सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. सपम कुंजकेश्वर सिंह हे लोकांसाठी काम करणारे आणि साध्या स्वभावाचे नेते होते. त्यांनी मणिपूरच्या जनतेसाठी केलेले काम कायम लक्षात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष अधिकारिमायुम शारदा देवी आणि पक्षातील इतर नेत्यांनीही शोक व्यक्त केला. पाटसोई मतदारसंघातील जनतेसाठी त्यांनी केलेले काम नेहमी स्मरणात राहील, असे भाजपने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. दरम्यान, दिवंगत आमदारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मणिपूर सरकारने संपूर्ण राज्यात अर्ध्या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.