गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजलपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सतीश पटेल यांनी 30,630 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार भीखा रबारी यांना 24,851 मते मिळाली. 30 जुलै रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज झालेल्या 20 फेऱ्यांच्या मतमोजणीत भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवत अखेर निर्णायक विजय मिळवला. सतीश पटेल यांना एकूण 55,481 मते मिळाली.
विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना सतीश पटेल यांनी या यशाचे श्रेय मांजलपूरच्या जनतेला आणि पक्ष कार्यकर्त्यांना दिले. ते म्हणाले, मांजलपूरच्या जनतेने ज्या प्रकारे स्वर्गीय योगेश काका यांच्यावर विश्वास दाखवला होता, त्याचप्रमाणे अभूतपूर्व आशीर्वाद मला देखील दिला आहे. हा विजय पूर्णपणे जनतेचा आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार भीखा रबारी यांनी पराभव स्वीकारत जनतेच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी आरोप केला की मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले, ज्यामुळे निवडणूक पूर्णपणे निष्पक्ष झाली नाही. तसेच त्यांनी आपल्या समर्थकांचे आणि मतदारांचे आभार मानत पुढेही लोकशाही मार्गाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
मांजलपूर विधानसभा मतदारसंघ भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झाला होता. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. 2008 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला असून, तेव्हापासून तो भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत योगेश पटेल यांनी 2012, 2017 आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सलग मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.