पूर्णियामध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला.
दोघे गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
मृत व जखमी हे सर्वजण दसऱ्याच्या मेळाव्यावरून परतत होते.
याआधी सहरसामध्येही या ट्रेनने एका वृद्धाचा जीव घेतला होता.
शुक्रवारी सकाळी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पूर्णिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कटिहार-जोगबनी रेल्वेमार्गावरील जबनपूर शहराजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तसेच जखमी सर्वजण दसऱ्याच्या मेळाव्यावरून परतत होते. दरम्यान, जोगबनी (अररिया) ते दानापूर (पाटणा) धावणारी वंदे भारत एक्सप्रेस येथे आली आणि प्रवाशांना धडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. माहिती मिळताच पोलीस आणि आरपीएफ पथकेही तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरू केला. मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जोगबनी-दानापूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मृत्यूची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी सहरसा जिल्ह्यातील हातियागाछी रेल्वे क्रॉसिंग परिसरात याच ट्रेनने एका वृद्ध व्यक्तीला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
ही वंदे भारत एक्सप्रेस नुकतीच सुरू करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णियाहून जोगबनी-दानापूर वंदे भारत एक्सप्रेसला व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला होता आणि १७ सप्टेंबरपासून नियमित सेवा सुरू झाल्या. सीमांचल प्रदेशाला राजधानी पटनाशी जोडणारी ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस मानली जाते.
या ट्रेनची वेळ पहाटे ३:२५ वाजता जोगबनीहून सुटण्याची असून ती सकाळी ४:५० वाजता पूर्णिया येथे पोहोचते. त्यानंतर सहरसा, खगरिया, समस्तीपूर आणि मुझफ्फरपूर मार्गे ती सकाळी ११:३० वाजता पाटण्यातील दानापूर येथे पोहोचते. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या या सेवेत अशा सततच्या अपघातांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.