बांगलादेश, गेल्या काही वर्षांपासून राजकीय उलथापालथीचं केंद्र ठरलेला देश. आणि आता पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक…राजधानी ढाक्यापासून अनेक जिल्ह्यांपर्यंत बॉम्बस्फोट, जाळपोळ आणि राजकीय कार्यकर्त्यांमधील संघर्षाच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक धक्कादायक घटना म्हणजे अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या चित्तगावमधील वडिलोपार्जित घराला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची माहिती समोर आलीय. इतकंच नाही, तर सिल्हेट, राजशाही, बारिसाल आणि फरिदपूरमध्ये युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या शाखांनाही लक्ष्य करण्यात आलंय.
बांगलादेशातील 64 प्रशासकीय जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांमध्ये डझनभर बॉम्बस्फोट झाले आहेत. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आलीय. ढाक्यातील हिंसाचारात किमान चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे नराईल जिल्ह्यात आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी बीएनपीच्या मोर्चावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या संघर्षात दोन स्थानिक नेत्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. फरिदपूर आणि पिरोजपूरमध्येही मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत.
हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेश सरकारनं सुरक्षा यंत्रणा अलर्टवर ठेवल्या आहेत. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये बॉर्डर गार्ड बांगलादेशचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत. ढाक्यात पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 565 जणांना अटक केलीय. यामध्ये शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळातील माजी शिक्षणमंत्री नुरुल इस्लाम नाहिद यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जातंय. गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीगनं लॉकडाऊनची घोषणा केलीय. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी शेख हसीना यांना विशेष न्यायाधिकरणाने अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या वर्षपूर्तीनिमित्त आवामी लीगने आंदोलनाची हाक दिलीय.
दरम्यान, शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याचा इरादा व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. या पार्श्वभूमीवर आवामी लीग, बीएनपी आणि इतर राजकीय शक्तींमधील संघर्ष पुन्हा तीव्र होतोय. बांगलादेशातील या घटनांमुळे देशाच्या राजकीय स्थैर्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. हिंसाचाराच्या घटना, राजकीय नेत्यांवरील हल्ले आणि सुरक्षा व्यवस्थेवरील ताण या परिस्थितीवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. हा केवळ राजकीय संघर्ष आहे की बांगलादेशात पुन्हा मोठ्या सत्तासंघर्षाची सुरुवात, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.