अजय दुधाणे, साम टीव्ही
उल्हासनगर महापालिकेतील सत्तासमीकरणावरून भाजप आणि शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून भाजपने शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उल्हासनगर महापालिकेत यापुढे युतीमधून बाहेर पडण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच आगामी कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करण्याची भूमिका भाजपने जाहीर केली आहे.
स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत शिवसेनेकडून खेळी करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. याच मुद्द्यावर आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी महापौर यांचे पती कमलेश निकम यांच्यावरही भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी सर्व 37 नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत उल्हासनगर पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आम्हाला ज्या पद्धतीने जखम देण्यात आली आहे, त्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम कुणी करेल का, असा सवाल उपस्थित केला. यावेळी सर्व नगरसेवकांनी हात वर करून नाही करणार, नाही करणार अशा घोषणा देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.