अल्-निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मोठा निर्णय घेण्यात आला असून, आगामी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दर बुधवारी १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
या नव्या निर्णयामुळे ठाणेकरांना आता दर आठवड्याला पाण्याच्या कपातीचा सामना करावा लागणार असून पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना आणि 'स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं.प्रा.लि.' यांच्या माध्यमातून ठाणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी १८ तासांचा शटडाऊन घेऊन दर बुधवारी १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या नियोजनानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात प्रत्येक बुधवारी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी ९.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या कपातीची अंमलबजावणी बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत पहिल्यांदा केली जाईल. या २४ तासांच्या कालावधीत ठाण्यातील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये नळांना पाणी येणार नाही.
पाणीकपातीमुळे ठाण्यातील अनेक प्रमुख वसाहतींवर परिणाम होणार आहे. खालील भागात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील
घोडबंदर रोड परिसर, लोकमान्यनगर व वर्तकनगर, साकेत आणि ऋतुपार्क परिसर, जेल, गांधीनगर व रुस्तमजी, सिद्धांचल आणि इंदिरानगर, रुपादेवी पाडा व श्रीनगर, समतानगर आणि सिद्धेश्वर, ईटर्निटी व जॉन्सन कंपनी परिसर, मुंब्रा आणि कळव्याचा काही भाग
अल्-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा आणि उपलब्ध जलसाठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाणी साठवून ठेवणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज बनली आहे.
ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी पाणीकपातीच्या दिवशी पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून मंगळवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच बुधवारच्या २४ तासांच्या शटडाऊन कालावधीत उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने, गरजपुरतेच वापरून प्रशासनाला सहकार्य करावे. पाणीकपातीचे हे वेळापत्रक पुढील आदेशापर्यंत दर आठवड्याला बुधवारी नियमितपणे लागू राहणार असल्याने ठाणेकरांनी त्यानुसार आपल्या दैनंदिन पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.