कोपरी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान सहापदरी उन्नत मार्ग उभारण्यात येणार
सिडकोकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टेंडर जारी
नवीन मार्गामुळे ठाणे ते विमानतळ प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा
ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे शहरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे आता अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यासाठी सिडकोकडून कोपरी ते नवी मुंबई विमानतळ असा सुमारे २५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार २७ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.
सध्या ठाण्यातून नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी नागरिकांना ठाणे-बेलापूर मार्ग किंवा शिळफाटा-तळोजा मार्गाचा वापर करावा लागतो. या दोन्ही मार्गांवर अनेकदा मोठी वाहतूककोंडी होते. त्यामुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. मात्र, नवीन उन्नत मार्ग तयार झाल्यानंतर हा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे ठाणे ते विमानतळ हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे..
हा सहापदरी मार्ग कोपरी येथून सुरू होऊन थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत जाणार आहे. या मार्गाला कोपरी-पटणी खाडी पूल, ऐरोली-काटई मार्ग, घाटकोपर-कोपरखैरणे जोडरस्ता, शीव-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आणि उलवे किनारी मार्ग अशा सहा ठिकाणी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांनाही या मार्गाचा फायदा होणार आहे.
या रस्त्यावर ताशी १०० किलोमीटर वेगमर्यादा ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रवासी वाहने आणि हलकी व्यावसायिक वाहने यांनाच या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. अवजड वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे.सिडकोने काढलेल्या टेंडरनुसार ५ जानेवारीपर्यंत कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहेत. ६ जानेवारीला निविदा उघडण्यात येतील. या प्रकल्पासाठी तीन वर्षांचा बांधकाम कालावधी निश्चित करण्यात आला असून, सवलत कालावधी ४० वर्षांचा असेल. या प्रकल्पामुळे ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल. मात्र, प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि मार्ग नागरिकांसाठी कधी खुला होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.