ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ ने महत्त्वाचा टप्पा गाठला.
कशेळी येथील मेट्रो डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन झाले.
सुमारे २७ हेक्टर जागेवर मेट्रो डेपो विकसित केला जात आहे.
डेपोमध्ये एकाच वेळी ३० मेट्रो ट्रेन ठेवण्याची क्षमता असेल.
विकास काटे, ठाणे
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांमधील प्रवास अधिक सोपा आणि जलद करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मेट्रो मार्गिका ५ संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाने आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कशेळी येथील मेट्रो डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएकडून या मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. कशेळी येथे मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणात डेपो उभारण्यात येत आहे. सुमारे २७ हेक्टर जागेवर हा डेपो विकसित केला जात आहे. या डेपोमध्ये एकाच वेळी तब्बल ३० मेट्रो ट्रेन ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी या डेपोचा मोठा उपयोग होणार आहे.
या डेपोमध्ये मेट्रो ट्रेनची तपासणी करण्यासाठी पाच स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येत आहेत. तसेच दुरुस्ती आणि देखभालीसाठी चार कार्यशाळा मार्गिका उभारल्या जात आहेत. याशिवाय ट्रेनची चाचणी घेण्यासाठी स्वतंत्र मार्ग आणि मेट्रो स्वच्छ करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिली मेट्रो ट्रेन डेपोमध्ये दाखल झाल्याने आता पुढील कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे. ट्रेनची तपासणी, तांत्रिक चाचण्या आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेट्रो सुरू करण्याच्या दिशेने पुढील पावले उचलली जातील.
मेट्रो मार्गिका ५ सुरू झाल्यानंतर ठाणे, भिवंडी आणि कल्याणदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच प्रवासासाठी लागणारा वेळही वाचण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाणेकरांना मेट्रो प्रवासाची सुविधा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू होण्याची तारीख अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.