शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा सोडून विधानसभा अध्यक्ष इतर विषयात वेळ घालवत आहेत, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
इतकंच नाही, तर विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर देखील ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळातील कोर्टात शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर राहुल नार्वेकर यांनी 25 सप्टेंबरला अपात्रतेप्रकरणी प्रत्यक्ष दुसरी सुनावणी घेतली होती.
यावेळी ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) सर्व दाखल 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलांकडून या मागणीला विरोध करण्यात आला. शिंदे गटाचे वकील अनिलसिह साखरे यांनी सर्व याचिका एकत्रित नको, स्वतंत्र सुनावणी घ्या, असा युक्तिवाद केला.
दरम्यान, दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत 13 ऑक्टोबरला सुनावणी घेऊ असं सांगितलं. त्यानंतर शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं संभाव्य वेळापत्रक देखील समोर आलं. या वेळापत्रकात कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या आमदार अपात्र प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
याच गोष्टीवरुन शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे. येत्या ०६ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात आमदार अपात्र प्रकरणावरील याचिकेवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत हा मुद्दा मांडला जाणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडेचं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.