पुण्यातील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २ कोटी १० लाख रुपयांची सायबर फसवणूक
सोशल मीडियावरील बनावट गुंतवणूक जाहिरातीद्वारे आरोपींनी साधला संपर्क
२० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर आठवड्यात चारपट परतावा देण्याचे आमिष
कमी वेळात गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सुरुवातीला गुंतवणुकीतून चांगला परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रँच आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) नाव घेत अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेले ७० वर्षीय नागरिक मुंढवा परिसरात एकटे राहतात. त्यांना सोशल मीडियावर गुंतवणुकीची एक जाहिरात दिसली होती. या जाहिरातीत प्रसिद्ध उद्योगपती, केंद्रीय मंत्री आणि खेळाडूंचे फोटो वापरण्यात आले होते. त्यामुळे जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने ही कंपनी ब्रिटनमधील असल्याचे सांगितले. तसेच केवळ २० हजार रुपये गुंतवल्यास एका आठवड्यात चारपट रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिकांनी पैसे पाठवल्यानंतर त्यांच्या खात्यात ८० हजार रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचा या योजनेवर विश्वास बसला.
यानंतर आरोपींनी त्यांना वारंवार अधिक पैसे गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीला पाच लाख रुपये आणि त्यानंतर मोठ्या रकमा जमा करण्यास भाग पाडले. एका टप्प्यात त्यांनी तब्बल १ कोटी ७ लाख रुपये पाठवले. त्यांच्या ऑनलाइन खात्यात गुंतवणूक वाढून २ कोटी ८० लाख रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत.
दरम्यान, २ जुलै रोजी एका व्यक्तीने फोन करून आपण ट्रायचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा गुन्ह्यात वापर झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रँच आणि ईडीकडून कारवाई होणार असल्याचे सांगून मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक करण्याची धमकी देण्यात आली. चौकशीसाठी पैसे जमा करावे लागतील आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ते परत मिळतील, असे सांगण्यात आले. अटकेच्या भीतीने ज्येष्ठ नागरिकांनी ८ ते १५ जुलैदरम्यान आणखी १ कोटी ४ लाख रुपये पाठवले. मात्र, काही दिवसांनी आरोपींनी संपर्क बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.