सचिन जाधव, साम टीव्ही
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी फटाके विक्री आणि फटाके फोडण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडण्यास बंदी असेल. नागरिकांना केवळ प्रकाश आणि रंग निर्माण करणारे बिनआवाजी फटाके तसेच पर्यावरणपूरक ग्रीन फटाके वापरण्यास मुभा राहणार आहे. तसेच विशिष्ट आकाराच्या ॲटमबॉम्बवरही कायदेशीर निर्बंध लागू राहणार आहेत.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालचा १०० मीटरचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या परिसरात फटाके फोडण्यास मनाई असेल. त्यामुळे दिवाळी साजरी करताना नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फटाक्यांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता, स्फोटक कायदा 1884 आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे नोंदवले जाऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे किंवा निर्धारित वेळेचे उल्लंघन करणे नागरिकांना महागात पडू शकते. दरम्यान, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ डायल 112 वर संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी केले आहे. दिवाळीचा सण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.