राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी आणखी ६ जणांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातला फरार शुभम लोणकर याच्या संपर्कातील ६ जणांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप ५ ते ६ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाबा सिद्धीकी यांचा हत्याप्रकरणाचे पुणे कनेक्शन घट्ट होत चालल्याचे दिसत आहे.
बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिसऱ्या दिवशी संध्याकाळी तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्या प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली होती. त्याची पोस्ट पुण्यात राहणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या तरुणाच्या फेसबूक अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस शुभम लोणकरचा शोध घेत होते. पण त्याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.
याप्रकरणात मुंबई पोलिसांनी लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली आहे. दोघेही बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. पुण्यात बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुण्यामध्ये बिष्णोई गँगची पाळेमुळे रुजल्याचे दिसून येत आहे. बिष्णोई गँगचा राजस्थान येथे २०२२ मध्ये कॅम्प पार पडला होता. या कॅम्पला शुभम लोणकर उपस्थित होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिथेच त्याने बिष्णोई गँगमध्ये सहभागी होण्याचे पाऊल उचलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
लोणकर गेली काही वर्षे पुण्यात वास्तव्यास असून त्याच्या माध्यमातून बिष्णोई गँग पुणे शहरात पाय पसरवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर मुंबई पोलिस आणि पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात शुभम लोणकर यांच्याशी संबंधित ११ ते १२ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील ६ जणांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.