सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Nashik corporate harassment case Pune link details : नाशिकमध्ये गेल्या १५-२० दिवसांपासून खळबळ उडवून देणाऱ्या 'खरात प्रकरणा'नंतर आता आणखी एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत महिलांवर अत्याचार होत असल्याचे प्रकरण समोर आले. अनेक महिलांवर लैंकिग आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी कंपनीत घडलेल्या या प्रकाराला पुण्यासोबत जोडला असून गंभीर असा आरोप केला आहे. नाशिक कंपनीत महिलांवर अत्याचार करणाऱ्या ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातील आहेत. त्यामुळेच पुण्यातील आयटी कंपन्यांतील अधिकारी लोकांचाही तपास झाला पाहिजे. नाशिकसारखा कुणी अधिकारी यामध्ये आहे का? हिंदू मुलींना टार्गेट केले जाते का? याचा तपास करायला हवा, असे गोपिचंद पडळकर म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीत कामाला असलेल्या हिंदू मुलींना टार्गेट करून लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर केले जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या प्रकरणाला त्यांनी 'कॉर्पोरेट जिहाद' असे म्हटले आहे. त्यांनी यामध्ये आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीतील काही 'टीम लीडर' आणि ठराविक प्रवृत्तीच्या तरुणांनी हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विशिष्ट 'टास्क' दिले होते. अधिकृत कामाचे निमित्त सांगून मुलींना बाहेर नेणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यानंतर त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे असे या कृत्याचे स्वरूप असल्याचे समोर आल्याचा आरोप केला जात आहे.
काही मुलींना बाहेर फिरायला घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. जर मुलींनी फोन उचलला नाही, तर थेट त्यांच्या आईला फोन करून त्रास दिला जात होता. या प्रकरणाचे गांभीर्य इतके आहे की, पीडित मुलींना परदेशात विकण्याचेही नियोजन सुरू होते, असा संशय पडळकर यांनी व्यक्त केला आहे. या त्रासाला कंटाळून अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या होत्या, तर काही जणी भीतीपोटी पुढे येत नव्हत्या. मात्र, आता नऊ मुलींनी हिंमत दाखवून तक्रारी दिल्या असून, त्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
पुण्यातील आयटी (IT) क्षेत्रातही नाशिकसारखेच रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पडळकर यांनी वर्तवली आहे. पुण्यातील आयटी हबमध्ये काम करणाऱ्या मुलींनी सतर्क राहण्याची गरज आहे. जर कोणासोबत असा प्रकार घडत असेल, तर त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे ते म्हणाले आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांवर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
हा प्रकार केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून, हे एक मोठे षडयंत्र आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील इतर मल्टिनेशनल कंपन्यांबाबतची माहिती देणार आहे, जेणेकरून आपल्या लेकी-बाळी सुरक्षित राहतील, असेही गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने 'विशेष तपास पथक' (SIT) स्थापन केले आहे. नाशिकमधील त्या कंपनीत एकूण १३० लोक कार्यरत आहेत. त्यातील कोणाकोणाचा यात सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. या कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंडिंग मिळते का? आणि यातील मुख्य सूत्रधार कोण आहेत? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.