मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेली मिठाई खाल्ल्यानंतर सहा जणांची प्रकृती बिघडली
३५ वर्षीय जुबेर अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू
इतर पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
पोलीस आणि एफडीए पुढील तपास करत आहेत
विकास काटे, मुंबई
सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करताना आता नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंब्रा परिसरात मिठाई खाल्ल्यानंतर सहा जणांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ३५ वर्षीय जुबेर अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ तारखेला एका तरुणाने मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी केली होती. ही मिठाई तो घरी घेऊन गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या काही मित्रांनी घरी भेट दिली. यावेळी तरुणाने मित्रांनाही तीच मिठाई खाण्यास दिली. मात्र, मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वांची प्रकृती बिघडू लागली.
सुरुवातीला नेमका त्रास कशामुळे होत आहे, हे समजू शकले नाही. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी ३५ वर्षीय जुबेर अन्सारी यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जणांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी संबंधित मिठाईच्या दुकानात तपास सुरू केला. तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) पथकानेही दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानातील मिठाईचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मिठाईमध्ये काही दोष आढळतो का आणि या घटनेचा मिठाईशी नेमका काय संबंध आहे, हे नमुन्यांच्या तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच घटनेमागचे नेमके कारण समोर येईल. त्यामुळे FDA संबंधित दुकानावर कोणती कारवाई करणार आणि तपासात काय निष्पन्न होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.