लालबाग राजाच्या मंडपाजवळ ६८ वर्षीय विजय आणेकर यांचा मृत्यू
हनुमान मंदिरात बसले असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडून ते बेशुद्ध पडले
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून काळाचौकी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. आज अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. तत्पूर्वी लालबाग परिसरातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबागच्या राजा गणेश मंडपाजवळ एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. गणेशोत्सवादरम्यान लालबाग परिसरात घडलेली ही दुसरी मृत्यूची घटना असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव विजय आणेकर (६८) असे आहे. ते लालबाग परिसरातीलच रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लालबागच्या राजा मंडपाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात ते बसले होते. यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले. घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना उपचारासाठी परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, लालबागच्या राजाच्या मंडपात यापूर्वीही अशीच घटना घडली होती. १७ सप्टेंबर रोजी पुण्याहून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय जयदीप मेघराज नेमाडे यांची प्रकृती अचानक बिघडली होती. दर्शनासाठी गर्दीत असताना त्यांची तब्येत खालावली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेच्या काही दिवसांतच पुन्हा ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने लालबाग परिसरातील वाढती गर्दी आणि भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन मदत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.