मुंबईतील सायन, विद्याविहार आणि गोरेगाव येथील तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे आज लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रम होणार
सायन येथील ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली
या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ३ महत्वाच्या उड्डाणपुलांचे लोकार्पण आज करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण पार पडेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. दरम्यान या ३ पुलांमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार आहे.सायन रेल्वे स्थानकाजवळील पुनर्बांधणी केलेला रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार स्थानकाजवळील पूर्व-पश्चिम जोडणारा पूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपूल या प्रकल्पांचा यात समावेश आहे. संबंधित ठिकाणी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
सायन येथील ११२ वर्षे जुन्या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या पुलाचे काम अनेक दिवसांपासून सुरु होते. दरम्यान हा पूल सुरु होण्यासाठी अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र आज या पुलाचे लोकार्पण करून नागरिकांसाठी सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कुर्ला मार्गावर पाचवी आणि सहावी रेल्वेमार्गिका उभारण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच धारावी, वांद्रे, बीकेसी, कुर्ला आणि पूर्व द्रुतगती महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना हा पूल उपयुक्त ठरेल. नियोजित वेळेच्या चार महिने आधी काम पूर्ण करण्यात आले आहे.
विद्याविहार येथील नव्या उड्डाणपुलामुळे पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांच्यात थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. या मार्गावरील प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांवरून सुमारे १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे घाटकोपर परिसरातील वाहतुकीवरील ताणही कमी होण्यास मदत होईल.लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण ६०० मीटर लांबीच्या आणि १५.५० ते १७.५० मीटर रुंदीच्या दोन मार्गिकांचा आहे. या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यांत विभागले आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्थापना आणि रेल्वे रुळांवर ९९.३४ मीटर लांबीच्या व २४.५० मीटर रुंदीच्या दोन तुळ्या बसवण्याचे काम ३१ मे २०२४ रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यात पूर्व व पश्चिम बाजूच्या ५०० मीटर लांब सेवा रस्त्यांचे बांधकाम, सोमय्या नाल्याचे विस्तारीकरण आणि मध्य रेल्वेच्या सेवा सुविधांचे स्थलांतर करण्याचे काम दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात आले.
गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ उभारलेला १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते संतोषनगर परिसरापर्यंतची जोडणी अधिक सुलभ होईल. भविष्यातील गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता आणि दुहेरी बोगदा प्रकल्पालाही यामुळे चालना मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे, गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यांतर्गत जुळ्या बोगद्यांद्वारे पूर्व व पश्चिम उपनगरांदरम्यान जोडणी तसेच जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, दिंडोशी न्यायालय, हॉटेल रत्नागिरी जंक्शन, वालभट नदी चौक तसेच लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेतील पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या तिन्ही प्रकल्पांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.