मनोज तांबे, साम टीव्ही
मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाला घर नाकारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भाईंदरमधील श्री राम सोसायटीमध्ये एका मराठी महिलेला केवळ मराठी असल्याच्या कारणावरून घर देण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताचा मिरा-भाईंदरचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भाईंदर पश्चिम येथील शिंदे गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर चालवणाऱ्या रविना शिंदे या गेल्या काही दिवसांपासून घराच्या शोधात होत्या. याच दरम्यान त्यांनी भाईंदरमधील श्री राम सदन सोसायटीमध्ये घर पाहिले होते. मात्र, त्या मराठी असल्याचे समजताच सोसायटीतील संबंधितांनी त्यांना घर देण्यास स्पष्ट नकार दिला, असा आरोप रविना शिंदे यांनी केला आहे. हा आपल्या मराठी अस्मितेचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला.
या घटनेची माहिती मिळताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट रविना शिंदे यांच्या चहाच्या स्टॉलला भेट दिली आणि त्यांची विचारपूस केली. शिंदे कुटुंबियांना धीर देत सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून मराठी माणसाला अशा प्रकारे दुजाभाव करणाऱ्या आणि घर नाकरणाऱ्या संबंधितांविरोधात कडक कायदेशीर पोलीस कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर घटनेमुळे भाईंदर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर पोलीस काय कारवाई करतात याकडे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.