पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या राजकारणात मोठी घडामोड
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेसमध्ये
मयूरसिंह पाटील यांचा काँग्रेसमध्ये स्वगृही प्रवेश
पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि दुधगंगा तालुका दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मयूरसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ आहेत.
मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तीन पिढ्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध आणि वैचारिक जडणघडण यामुळे स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मयूरसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे चुलते दिवंगत शंकरराव पाटील यांच्या राजकीय वारशातील आहेत. शंकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सहावेळा आमदारकी तर बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदारकी भूषवली होती.
काँग्रेसशी निष्ठा असलेल्या या कुटुंबातील मयूरसिंह पाटील यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ मयूरसिंह पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झालीय.
मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसने त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि स्थानिक संपर्काचा संघटनात्मक कामासाठी उपयोग करून घेण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने मयूरसिंह पाटील यांची इंदापूरमधील राजकीय भूमिका आता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी काँग्रेसची बांधणी करण्याची जबाबदारी असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.