संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण रेल्वे स्थानकात महिला पॉईंट्समनसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत मनसे रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डीवाय स्टेशन मास्तरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कल्याण जीआरपीने संबंधित मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या एका महिला पॉईंट्समनला डीवाय स्टेशन मास्तर आशुतोष कुमार हे गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून त्रास देत असल्याचा आरोप आहे. तसेच, महिलेला घरी येण्यास सांगणे आणि तिच्याशी अश्लील भाषेत बोलणे, अशा प्रकारचे गैरवर्तन केल्याची तक्रार संबंधित महिला कर्मचाऱ्याने मनसे रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती.
ही बाब समोर आल्यानंतर मनसे रेल्वे कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात जाऊन डीवाय स्टेशन मास्तर आशुतोष कुमार यांना जाब विचारला. यावेळी वाद वाढल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
संबंधित महिला कर्मचाऱ्यानेही जीआरपी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणात महिला कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांची तसेच डीवाय स्टेशन मास्तरला झालेल्या मारहाणीची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे. तक्रारी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कल्याण जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.