कल्याणजवळील फ्लॅटवर पोलिसांचा छापा
20 किलोहून अधिक गांजा जप्त
एका महिलेसह दोघांना अटक
भिवंडी-कल्याण परिसरात खळबळ
कल्याणजवळच्या एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल २० किलो गांजा जप्त केला. भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ही मोठी कारवाई केली. दोन सुटकेसमध्ये साठवलेला ६ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा २० किलो ७६० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि तिचा साथीदार अशा दोघांना अटक केली. उच्चभ्रू सोसायटीमध्ये गांजा विक्री सुरू असल्यामुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून टेमघर पाडा कल्याण रोड येथील अरिहंत कॉम्प्लेक्स येथील इमारतीमधील एका फ्लॅट्समध्ये विक्री साठी गांजा आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या पथकांनी इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील संशयित फ्लॅटवर छापा टाकला असता दोन सुटकेसमध्ये गांजा सापडला.
याठिकाणी राहणारी महिला मिंटूदेवी विनोद सिंग कुशवाह, (वय ४० वर्षे) आणि तिचा साथीदार दुर्गा राजेंद्र शाह (वय ४३ वर्षे) अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या लाल आणि निळ्या रंगाच्या दोन सुटकेसची तपासणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी १० किलो प्रमाणे गांजा प्लास्टिक गोणीमध्ये भरून ठेवलेला असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात दोघांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड करत आहेत. या घटनेमुळे कल्याण आणि भिवंडी परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.