IAS Tukaram Mundhe career advice to students : पिंपरी-चिंचवडमधील ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’ कार्यक्रमात एका तरुणाने थेट आयएएस अधिकारी होण्याबाबत प्रश्न विचारला, ज्यावर IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अत्यंत मार्मिक आणि रोखठोक उत्तर दिले. मुलांनी किंवा मुलींनी करिअर निवडताना केवळ इतरांचे अनुकरण न करता स्वतःचे कौशल्य आणि 'प्रॉब्लेम स्टेटमेंट' शोधले पाहिजे, असे सांगत त्यांनी यावर सविस्तर भाष्य केले.
मुलांनी किंवा मुलींनी "आयएएस (IAS) अधिकारी व्हावं की यशस्वी उद्योजक व्हावं?" असा प्रश्न तुकाराम मुंढे यांना पिंपरी चिंचवडमध्ये 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो'कार्यक्रमात विचारला. ते म्हणाले की, आपण समाजाचा एक भाग आहोत आणि समाजात मूल्यवर्धन (Value addition) केले पाहिजे. जर मुलांनी विचारले की, आयएएस होऊ का? तर त्याचे उत्तर 'नाही' असेच असेल, कारण हा पूर्णपणे त्यांचा स्वतःचा चॉइस (निवड) असावा लागतो. मुलांनी त्यांचे कौशल्य काय आहे, त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, हे स्वतः शोधून त्यावर काम करणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो'मध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. "दुष्काळाकडे केवळ एक आव्हान म्हणून नव्हे, तर 'प्रॉब्लेम स्टेटमेंट' म्हणून बघा. दुष्काळ नेमका का येतो आणि पुढील ६ ते ७ महिन्यांत आपण यावर काय करू शकतो, याचा गांभीर्याने विचार करा," असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले. तसेच दुष्काळाच्या काळात दुग्ध व्यवसायात मोठ्या संधी असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण भागात 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त केली.
दुग्ध व्यवसायातील संधी आणि अन्न व औषध प्रशासन:
"मी अन्न व औषध प्रशासन (FDA) क्षेत्रात काम करतो, ज्याच्या कक्षेत दूधही येते. आपल्याकडे दुधाची कमतरता आहे का? तर हो, नक्कीच आहे. त्यामुळे दुग्ध उद्योजक वाढू शकतात का? तर नक्कीच वाढू शकतात. दुधाला चांगला दर मिळू शकतो का? तर गेल्या दोन-चार महिन्यांत दर वाढले आहेत आणि पुढे आणखी वाढतील. या क्षेत्रातील गैरप्रकार रोखणे गरजेचे असून यात मी नियामक (Regulator) म्हणून काम करत आहे. मात्र, यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे," असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.
कमी पाण्यात दुग्ध व्यवसाय आणि हायड्रोपॉनिक्सचा वापर:
तुकाराम मुंढे पुढे म्हणाले, "मी पशुसंवर्धन विभागात असताना तो विभाग एक 'उद्योजक' म्हणून बघावा, असे मी ठरवले होते. आपण ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय करायचे ठरवले तर त्यात खूप संधी आहेत. यासाठी गाई घ्याव्या लागतील, पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे प्रश्न उपस्थित होतात. परंतु हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञान म्हणजे नवरात्रातील घटस्थापनेपेक्षा वेगळे काही नाही; फक्त ते शेतकऱ्यांना व्यवस्थित समजून सांगण्याची गरज आहे. जितके पाणी तुळशीला लागते, तितकेच हायड्रोपॉनिक्ससाठी लागते, त्यापेक्षा जास्त नाही. हे तंत्रज्ञान वापरल्यास पशुआहारात प्रोटीन अधिक मिळते आणि दुधाचे उत्पादन वाढते. त्यामुळे कमी पाण्यातही दुग्ध व्यवसाय करणे शक्य आहे. दूध शुद्ध असेल तर त्याला मोठी मागणी असते आणि दुग्धजन्य प्रक्रिया उद्योगही उभारता येतात."
शासकीय मदतीवर अवलंबून न राहता मूळ प्रश्नाचा विचार करा:
"दुष्काळाकडे नेहमी 'प्रॉब्लेम स्टेटमेंट' म्हणून पाहिले पाहिजे. मदत करणे हे शासनाचे काम आहे आणि ते करत राहतील. पण आपण दरवर्षी टँकर मागतो, ट्युबवेल मागतो; कधी आपण या मूळ प्रश्नाचा सखोल विचार केला आहे का? आपण दरवर्षी शासनाकडे मागतो, शासन मदत देते, पण ते पाणी जाते कुठे? एका गावासाठी किती ट्युबवेल खोदल्या गेल्या, याचे कधी अकाउंटिंग (हिशोब) केले आहे का?" असा थेट सवाल तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला.
कॉंक्रिटीकरण आणि आटणारे पाण्याचे स्रोत:
आपले अनुभव सांगताना ते म्हणाले, "मी 'जेन झी' (Gen Z) सारख्या डिजिटल युगात जन्मलेला नाही, पण त्याचा वापर नक्की करतो. लहानपणी आमच्या गावात शेती व्हायची. त्यावेळी गावात हापसा किंवा हँडपंप नव्हता. नंतर ट्युबवेल आले, पाईपलाईन आली आणि गावात कॉंक्रिटचे रस्ते झाले. आज गावातील विहिरी आणि ट्युबवेलचे पाणी आटले आहे. निसर्गाने दिलेले पाणी तळ्यात गेले, कारण तुमच्या गावातून आणि शेतातून ते वाहून गेले. कॉंक्रिटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेले. जिथे आवश्यक आहे तिथे कॉंक्रिटीकरण करा, पण पाणी गावातच राहिले पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.
'पाणी अडवा, पाणी जिरवा' हाच एकमेव शाश्वत उपाय:
"दुष्काळावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हाच आहे. तुमच्या गावातील पाणी गावातच मुरणे हा सर्वात मोठा असेट (मालमत्ता) आहे. जिथे जिथे दरवर्षी ३०० ते १००० मिलीमीटर पाऊस पडतो, ते पाणी कुठे जाते? पूर्वी शेताला ५ फुटांचा बांध असायचा, तो आता १ फूटही राहिला नाही. बांध कोरल्यामुळे पाणी शेतात थांबत नाही, ते थेट वाहून नदीला आणि तिथून तळ्यात जाते. तुम्ही निसर्गाने दिलेले मोफत पाणी वाया घालवता आणि नंतर तेच पाणी विकत घेता," असे मुंढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.